भारत आणि न्यूझीलंड एकादश यांच्यातला सराव सामना अनिर्णित राहिला. पहिल्या डावातील हाराकिरीनंतर टीम इंडियानं गोलंदाजांच्या जोरावर सामन्यात कमबॅक केले. पहिल्या डावातील 28 धावांच्या आघाडीत टीम इंडियानं तिसऱ्या दिवशी 4 बाद 252 धावा करताना सामना अनिर्णित राखला. दुसऱ्या डावात मयांक अग्रवालला गवसलेला सूर हा टीम इंडियासाठी आनंदाची बातमी आहे. शिवाय रिषभ पंतनंही अर्धशतकी खेळी करताना कसोटी संघात पुनरागमनासाठी दावा सांगितला आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना 21 फेब्रुवारापीसून सुरु होणार आहे.
दुसऱ्या डावात अग्रवालनं 99 चेंडूंत 10 चौकार व 3 षटकार खेचून 81 धावांची खेळी केली. रिषभने 65 चेंडूंत 70 धावा कुटल्या. भारतानं दुसऱ्या डावात 48 षटकांत 4 बाद 252 धावा करून 280 धावांची आघाडी घेतली. पंत आणि अग्रवाल यांच्या व्यतिरिक्त पृथ्वी शॉ ( 39) यांनेही चांगली खेळी केली. रोहित शर्माच्या अनुपस्थितित कसोटी सामन्यात पृथ्वीला संधी मिळू शकते. रिषभचा स्पर्धक वृद्धीमान साहानं नाबाद 30 धावा केल्या आणि आर अश्विननं नाबाद 16 धावा केल्या.
न्यूझीलंड एकादश संघाचा कर्णधार डॅरील मिचेलनं 33 धावांत 3 फलंदाज बाद केले. पहिल्या डावात चेतेश्वर पुजारा ( 93) आणि हनुमा विहारी ( 101*) यांनी दमदार खेळ करताना संघाला 250 धावांचा पल्ला गाठून दिला. स्कॉट कुग्गेलईजन ( 4/30), जॅक गिब्सन ( 2/26) आणि इश सोढी ( 3/72) यांनी चांगली गोलंदाजी केली. भारताच्या पहिल्या डावाच्या 263 धावांचा पाठलाग करताना जसप्रीत बुमराह ( 2/18), मोहम्मद शमी ( 2/48), उमेश यादव ( 2/49) आणि नवदीप सैनी ( 2/58) यांनी न्यूझीलंड एकादश संघाचा डाव 235 धावांत गुंडाळला.
संक्षिप्त धावफलक - भारत ( पहिला डाव) सर्वबाद 263 ( हनुमा विहारी 101*, चेतेश्वर पुजारा 93; स्कॉट कुग्गेलेईजन 3/40) आणि (दुसरा डाव) 4 बाद 252 ( मयांक अग्रवाल 81*, रिषभ पंत 70; डॅरील मिचेल 3/33) वि. न्यूझीलंड एकादश ( पहिला डाव) सर्वबाद 235 ( हेन्री कूपर 40, राचीन रवींद्र 34; मोहम्मद शमी 3/17, जसप्रीत बुमराह 2/18); अनिर्णित