ऑकलंड : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा सामना शनिवारी झाला. भारताला दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता. हा सामना तुम्हीही पाहिला असेल, पण या सामन्यात घडलेली एक गोष्ट तुम्हाला माहितीही नसेल...
न्यूझीलंड संघानं दुसऱ्या वन डे सामन्यात 22 धावांनी विजय मिळवून भारताविरुद्धची तीन सामन्यांची मालिका खिशात घातली. ट्वेंटी-20 मालिकेत दारूण पराभव पत्करणाऱ्या न्यूझीलंड संघानं वन डे मालिकेत दमदार कमबॅक केले. पहिल्या सामन्यातील विजयाची परंपरा दुसऱ्या सामन्यातही कायम राखून त्यांनी मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आघाडीच्या फलंदाजांनी पत्करलेली शरणागती अन् रवींद्र जडेजा आणि नवदीप सैनी यांनी दिलेली झुंज अपयशी ठरल्यानं भारताला पराभव पत्करावा लागला.
मार्टीन गुप्तील आणि हेन्री निकोल्स यांच्या दमदार ( 93 धावा) सलामीनंतरही किवींच्या अन्य फलंदाजांनी शरणागती पत्करली. रॉस टेलरनं पुन्हा एकदा अखेरच्या षटकांत उपयुक्त खेळी करत जोरदार पलटवार केला. त्यानं पदार्पणवीर कायले जॅमिसनला सोबत घेताना नवव्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी केली. न्यूझीलंडनं 8 बाद 273 धावा केल्या. जॅमिसन 24 चेंडूंत 25 धावांवर ( 1 चौकार व 2 षटकार) नाबाद राहिला. रॉसनं 74 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकार खेचून नाबाद 73 धावा केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची आघाडीची फळी ढेपाळली. पृथ्वी शॉ ( 24), मयांक अग्रवाल ( 3), विराट कोहली ( 15), लोकेश राहुल ( 4) आणि केदार जाधव ( 9) यांना माघारी पाठवून न्यूझीलंडनं विजयाचा पाया रचला होता. पण, श्रेयस अय्यरनं फॉर्म कायम राखताना अर्धशतकी खेळी केली. त्यानं 57 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकार खेचून 52 धावा केल्या. पण, अर्धशतक पूर्ण केल्यानंतर चुकीचा फटक मारून तोही माघारी परतला. त्यानंतर रवींद्र जडेजा आणि नवदीप सैनी यांनी आठव्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी करताना सामन्यातील चुरस कायम राखली होती. कायले जेमीसननं ही जोडी संपुष्टात आणली. सैनीनं 49 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकार खेचून 45 धावा केल्या. जडेजानं 73 चेंडूंत 2 चौकार व 1 षटकार खेचून 55 धावा केल्या.
या सामन्यात जेव्हा न्यूझीलंडचा संघ फिल्डींग करत होता. तेव्हा न्यूझीलंडचा फिरकीपटू मिचेल सँटनरच्या पोटात दुखू लागले होते. त्यावेळी भारताच्या डावाच्या ३६व्या षटकात सँटनर पॅव्हेलियनमध्ये गेला होता. त्यावेळी न्यूझीलंडचे सहाय्यक प्रशिक्षक ल्यूक राँची फिल्डींगला आले होते.