NZ vs PAK 1st T20I : न्यूझीलंडने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात पाकिस्तानवर ४६ धावांनी दणदणीत विजय मिळवला. न्यूझीलंडच्या २२६ धावांचा पाठलाग करताना बाबर आजमने ५७ धावांची खेळी करून अनेक विक्रम नोंदवले, परंतु तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. टीम साऊदीने २५ धावांत ४ विकेट्स घेतल्या. पाकिस्तानने १५९ धावांवर सहावी विकेट गमवाली आणि त्यानंतर पुढील २१ धावांत ऑल आऊट झाले. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन ( ५७) व डॅरिल मिचेल ( ६१) यांच्या अर्धशतकी खेळीने पाकिस्तानचे कंबरडे मोडले. त्यात फिन अॅलेन, मार्क चॅम्पमन यांनीही हात धुवून घेतले. फिनने शाहीनच्या एका षटकात २४ धावा चोपताना १५ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारासह ३५ धावांची खेळी केली. केनने ४२ चेंडूंत ९ चौकारांसह ५७ धावांची खेळी केली. डॅरिल मिचेलने २७ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारांसह ६१ धावांवर माघारी परतला. ग्लेन फिलिप्सने ११ चेंडूंत १९ धावा, मार्क चॅम्पमनने ११ चेंडूंत २६ धावा करताना धावसंख्येत हारभार लावला. न्यूझीलंडने ८ बाद २२६ धावांचा डोंगर उभा केला.
सईम आयुबने ७ चेंडूंत २७ धावा ( २ चौकार व ३ षटकार) चोपून पाकिस्तानला दमदार सुरुवात करून दिली. दुर्दैवाने तो रन आऊट झाला. मोहम्मद रिझवान १४ चेंडूंत २५ धावा करून माघारी परतला. फखर जमान ( १५), इफ्तिखार अहमद ( २४) व आजम खान ( १०) हे अपयशी ठरले, परंतु बाबर आजम खेळपट्टीवर उभा राहिला आणि त्याने अर्धशतक झळकावले. २३ चेंडूंत ५४ धावांची गरज असताना पाकिस्तानला बाबरचाच सहारा होता, परंतु बेन सिअर्सने किवींना मोठी विकेट मिळवून दिली. बबर ३५ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारासह ५७ धावांवर केन विलियम्सनच्या हाती झेल देऊन परतला. त्याच षटकात उसामा मीरही ( १) बाद झाल्याने पाकिस्तानचा पराभव निश्चित झाला. पाकिस्तानचा संपूर्ण संघ १८ षटकांत १८० धावांत तंबूत परतला.
बाबरचे विक्रम...
- आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तील बाबरची ही ३४वी फिफ्टी प्लस धावांची खेळी ठरली आणि त्याने रोहित शर्माला ( ३३) मागे टाकले. विराट कोहली (३८) या विक्रमात अव्वल आहे. परदेशातील बाबरची ही १५ वी फिफ्टी प्लस धावांची खेळी आहे आणि त्याने रोहितशी बरोबरी केली.
- बाबरने आजच्या खेळीसह ३५०० धावांचा टप्पाही पार केला आणि आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराट कोहली ( ४००८), रोहित शर्मा ( ३८५३) यांच्यानंतर बाबरने ( ३५३८*) याने नंबर लावला. विराटने ९६ इनिंग्जमध्ये हा टप्पा ओलांडला होता आणि बाबरला ९९ इनिंग्ज खेळाव्या लागल्या.