NZ vs PAK 2nd ODI: सध्या पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्या वनडे सीरिज सुरू आहे. दुसऱ्या वनडेत न्यूझीलंडनेपाकिस्तानचा 79 धावांनी पराभव केला. न्यूझीलंडच्या विजयाचा हिरो ठरलेल्या डेव्हॉन कॉनवेने 101 धावांची शानदार खेळी केली. या विजयासह किवीने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 13 जानेवारीला कराचीत होणार आहे. या सामन्यादरम्यान अंपायर अलीम दार यांची चांगलीच चर्चा झाली.
वसीमच्या थ्रोवर दार जखमी झालान्यूझीलंडच्या डावातील 36 व्या षटकात एक विचित्र घटना घडली. या षटकात ग्लेन फिलिप्सने चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने फ्लिक केला आणि एकेरी धाव घेतली. यावेळी तिथे फिल्डींग करणाऱ्या वसीम ज्युनियरने चेंडू नॉन स्ट्रायकर एंडच्या दिशेने फेकला. पण, थ्रो थेट अंपायर अलीम दारच्या उजव्या पायाच्या घोट्याला लागला. यानंतर अलीम दार चांगलेच संतापले आणि त्यांनी गोलंदाज हरिस रौफचे स्वेटर जमिनीवर फेकले.
नसीम शाहने पाय पकडलेअलीम दारने स्वेटर फेकल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि हरिस रौफ हसताना दिसले. तर, गोलंदाज नसीम शाहने दार यांचा पाय धरले आणि दुखणे कमी व्हावे म्हणून पाय चोळले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
सामन्यात काय झालं?नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचा संपूर्ण डाव 49.5 षटकांत 261 धावांत आटोपला. डेव्हन कॉनवेने 92 चेंडूत 13 चौकार आणि एका षटकारासह 101 धावा केल्या. तर, कर्णधार केन विल्यमसनने 85 धावांची खेळी केली. विल्यमसन आणि कॉनवे यांनी दुसऱ्या विकेटसाठी 181 धावांची भागीदारी केली. या भागीदारीनंतर न्यूझीलंडची अवस्था बिकट झाली आणि त्यांनी शेवटच्या नऊ विकेट 78 धावांत गमावल्या. 262 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची फलंदाजी सपशेल फसली आणि संपूर्ण संघ 43 षटकांत 182 धावांत गारद झाला. कर्णधार बाबर आझमने 79 धावांची खेळी केली. तर मोहम्मद रिझवानने 28 आणि आगा सलमानने 25 धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून ईश सोधी आणि टीम साऊदीने प्रत्येकी दोन गडी बाद केले.