NZ vs PAK : पहिल्या ट्वेंटी-20तील पराभवानंतर पाकिस्तानी संघानं न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी पुन्हा नांग्या टाकल्या, परंतु ४० वर्षीय मोहम्मद हाफिज ( Mohammad Hafeez) यानं एकट्यानं खिंड लढवताना अविश्वसनीय खेळी केली. त्याच्या फटकेबाजीमुळे पाकिस्ताननं ६ बाद १६३ धावांपर्यंत मजल मारली. हाफिजनं या सामन्यात इतिहास रचला.
पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदर अली ( ८) व अब्दुल्लाह शफिक ( ०) यांना अपयश आलं. सलामीवीर मोहम्मद रिझवान ( २२) यानं संघर्ष केला, परंतु टीम साऊदीनं अली व शफिक प्रमाणे त्यालाही माघारी पाठवले. कर्णधार शाबाद खान ( ४) हाही खास काही करू शकला नाही. टीम साऊदीनं २१ धावांत ४ विकेट्स घेत पाकिस्तान संघाभवती फास आवळला होता. तो हाफिजनं सैल केला. हाफिजनं ५७ चेंडूंत १० चौकार व ५ षटकार खेचून नाबाद ९९ धावा केल्या. हाफिजनं अखेरच्या चेंडूवर षटकार मारून ही खेळी केली.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20त ९९ धावा करणारा तो चौथा फलंदाज ठरला. अॅलेक्स हेल्स ( ९९ वि. वेस्ट इंडिज, २०१२), ल्युक राईट ( ९९* वि. अफगाणिस्तान, २०१२), डेव्हिड मलान ( ९९* वि. दक्षिण आफ्रिका, २०२०) यांनी ट्वेंटी-20त ९९ धावा केल्या आहेत. वयाच्या ४०व्या वर्षी नाबाद ९९ धावा करणारा हाफिज हा पहिलाच खेळाडू. यापूर्वी याचवर्षी माल्टा संघाच्या ४० वर्षीय हेन्रीच गेरीकनं बल्गेरियाविरुद्ध ९१ धावा केल्या होत्या. त्यामुळे हाफिजनं केलेली खेळी ही ४०वर्षीय खेळाडूची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे.
पाकिस्तान संघाकडून ट्वेंटी-20तील ही दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे. अहमद शेहजादनं बांगलादेशविरुद्ध नाबाद १११ धावा केल्या होत्या.