Join us  

NZ vs PAK : पाकिस्तानला धुळ चारून न्यूझीलंड इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर, ऑस्ट्रेलियाला बसणार धक्का?

NZ vs PAK : न्यूझीलंडविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात फवाद आलम ( Fawad Alam) याच्या शतकानं पाकिस्तानच्या विजयाच्या आशा जीवंत केल्या. त्याला कर्णधार मोहम्मद रिझवान याच्य अर्धशतकाची साथ मिळाल्यानं त्या आशा आणखी पल्लवीत झाल्या होत्या.

By स्वदेश घाणेकर | Published: December 30, 2020 12:59 PM

Open in App

चुरशीच्या झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडनं अखेरपर्यंत विजयाची आस सोडली नाही आणि कर्णधार केन विलियम्सननं सुरेख क्षेत्ररक्षण लावून पाकिस्तानची कोंडी केली. पाचव्या दिवसाची अखेरची ४.३ षटकं शिल्लक असताना न्यूझीलंडनं थरारक सामन्यात अखेरची विकेट घेत पाकिस्तानला हार मानण्यास भाग पाडले. मिचेल सँटनरनं अखेरची विकेट घेताच न्यूझीलंडच्या खेळाडूंनी जल्लोष केला. या विजयासह न्यूझीलंडनं आयसीसी कसोटी क्रमवारीत (  ICC Test Team Rankings ) अव्वल स्थानानजीक झेप घेतली आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोघांच्या खात्यात आता ११६ गुण आहेत आणि पाकिस्तानविरुद्ध मालिका जिंकून ते इतिहासात प्रथमच अव्वल स्थानी विराजमान होण्यासाठी सज्ज झाले आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात फवाद आलम ( Fawad Alam) याच्या शतकानं पाकिस्तानच्या विजयाच्या आशा जीवंत केल्या. त्याला कर्णधार मोहम्मद रिझवान याच्य अर्धशतकाची साथ मिळाल्यानं त्या आशा आणखी पल्लवीत झाल्या होत्या. फवादनं कसोटीतील दुसरं आणि २००९नंतर पहिलं शतक झळकावले, परंतु न्यूझीलंडनं सामन्यात कमबॅक केलं. न्यूझीलंडनं पहिला कसोटी सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. केन विलियम्सनच्या ( १२९) शतकाच्या आणि रॉस टेलर ( ७०), हेन्री निकोल्स ( ५६) व बी जे वॉटलिंग ( ७३) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर न्यूझीलंडनं पहिल्या डावात ४३१ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा पहिला डाव २३९ धावांवर गडगडला. न्यूझीलंडनं दुसरा डाव ५ बाद १८० धावांवर घोषित करून पाकिस्तानसमोर ३७३ धावांचे लक्ष्य ठेवले.  

न्यूझीलंडनं ठेवलेल्या ३७३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्ताननं ३ बाद ७१ धावांवरून पाचव्या दिवसाची सुरुवात केली. अझर अली आणि फवाद यांनी पाचव्या दिवसाच्या खेळाची सुरुवात केली. ट्रेंट बोल्टनं पाकिस्तानला चौथा धक्का दिला. त्यानं अझर अलीला ( ३८ ) बाद केले.  फवाद आणि मोहम्मद रिझवान यांनी पाचव्या विकेटसाठी १६५ धावांची भागीदारी करून पाकिस्तानच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या. कायले जेमिन्सननं पाकिस्तानचा कर्णधार रिझवानला पायचीत केले. रिझवान १९१ चेंडूंत ६० धावांवर माघारी परतला. त्यापाठोपाठ नील वॅगनरनं एक जबरदस्त धक्का दिला. फवाद २६९ चेंडूंत १४ चौकारांसह १०२ धावांवर माघारी परतला. फहीम अश्रफ ( १९), यासीर शाह ( ०) आणि मोहम्मद अब्बास ( १) यांना बाद करून न्यूझीलंडनं कमबॅक केले. पाकिस्तानच्या अखेरच्या विकेटनं किवी गोलंदाजांना झुंजवलं. पण, दिवस संपायला चार षटकं शिल्लक असताना पाकिस्तानची अखेरची विकेट पडली. पाकिस्ताचा संपूर्ण संघ २७१ धावांत तंबूत पाठवून न्यूझीलंडनं १०१ धावांनी सामना जिंकला.  World Test Championship Points Table मध्येही न्यूझीलंडनं टॉप टू च्या शर्यतीत स्वतःला कायम राखले आहे.  

टॅग्स :न्यूझीलंडपाकिस्तानआयसीसीआॅस्ट्रेलिया