NZ vs PAK 4th T20I : न्यूझीलंडने चौथ्या ट्वेंटी-२० सामन्यातही पाकिस्तानला पराभवाचे पाणी पाजले. पाच सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने आता ४-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. १५९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने २० धावांवर ३ फलंदाज गमावले. शाहीन शाह आफ्रिदीने तिन्ही फलंदाज माघारी पाठवले. पण, डॅरील मिचेल व ग्लेन फिलिप्स यांनी वैयक्तिक अर्धशतकासह चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून किवींचा विजय पक्का केला.
५ सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेत ३-० असा सपाटून मार खाणाऱ्या पाकिस्तानची चौथ्या सामन्यातही लाजीरवाणी कामगिरी झाली. मोहम्मद रिझवान वगळता अन्य फलंदाजांनी निराश केले. मोहम्मद रिझवानने ६३ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह नाबाद ९० धावा केल्या. मोहम्मद नवाजने ९ चेंडूत २१ धावा करून हातभार लावला. बाबर आजम ( १९) व इफ्तिखार अहमद ( १०) यांना फार काही करता आले नाही आणि पाकिस्तानाला ५ बाद १५८ धावांवर समाधान मानावे लागले. मॅट हेन्री व ल्युकी फर्ग्युसन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
पाकिस्तानचा कर्णधार व प्रमुख गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने पहिल्याच षटकात न्यूझीलंडला दोन धक्के दिले. डेवॉन कॉनवे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने तो आज खेळत नाही. टीम सेइफर्ट व फिन अॅलन ( ८) हे पहिल्याच षटकात बाद झाले. त्यानंतर तिसऱ्या षटकात विल यंग ( ४) याचा मोहम्मद नवाजने अफलातून झेल घेतला. शाहीनला तिसरी विकेट मिळाली. पण, डॅरिल मिचेल व ग्लेन फिलिप्स यांनी पाकिस्तानचे मनसुबे उधळून लावले. फिलिप्सने ४१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले, तर मिचेलला ३५ धावांवर झेल टाकला.
मिचेलने षटकार खेचून अर्धशतक पूर्ण केले. मिचेल व फिलिप्स यांनी १३९ धावांची नाबाद भागीदारी केली. मिचेलने ४४ चेंडूंत ७ चौकार व २ षटकार खेचून नाबाद ७२ धावा केल्या. फिलिप्सनेही ५२ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारासह नाबाद ७० धावा चोपल्या. न्यूझीलंडने १८.१ षटकांत ३ बाद १५९ धावा करून विजय पक्का केला.