न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान संघाचा आणखी एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. ५३ जणांचा चमू न्यूझीलंडमध्ये दाखल झाला आणि तेथे चाचणी केल्यानंतर त्यापैकी ६ खेळाडू पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. त्यानंतर शुक्रवारी आणखी एकदा या सर्वांची चाचणी करण्यात आली आणि त्यात सातवा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. या सर्वांना १४ दिवसांच्या आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.
न्यूझीलंडच्या आरोग्य मंत्रालयानं सांगितले की,''पाकिस्तान क्रिकेट संघातील आणखी एका खेळाडूचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तिसऱ्या स्वॅब टेस्टींगनंतर ही रिपोर्ट समोर आला. आधीचे सहा आणि आताचा एक असे सात खेळाडू वगळता अन्य सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.'' आयसोलेशन कालावधीच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानच्या खेळाडूंनी नियमांचं उल्लंघन केलं आहे. CCTV फुटेजमध्ये हे खेळाडू हॉटेलच्या कॉरिडोअर्समध्ये एकमेकांना भेटत असून जेवण शेअर करत असल्याचे दिसले. त्यानंतर आरोग्य मंत्रालयानं पाकिस्तानी खेळाडूंना अंतिम वॉर्निंग दिली आहे.
पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे सीईओ वसीम खान यांनी खेळाडूंना काही सूचना केल्या आहेत. ते म्हणाले,''मी न्यूझीलंड सरकारशी चर्चा केली आणि तुन्ही तीन-चार वेळा आयसोलेशन नियमांचं उल्लंघन केल्याचे, त्यांनी सांगितले. कोरोना नियमासंदर्भात ते कोणताही गलथानपणा खपवून घेणार नाहीत आणि त्यांनी आपल्याला फायनल वॉर्निंग दिली आहे. तुमच्यासाठी ही आव्हानात्मक काळ आहे, हे मी समजू शकतो आणि अशाच परिस्थितीला तुम्ही इंग्लंडमध्ये सामोरे गेला आहात. पण, हा आपल्या देशाच्या इभ्रतीचा प्रश्न आहे. १४दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीचे काटेकोर पालन करा आणि त्यानंतर तुम्ही फ्री आहात. आणखी एक चूक आणि ते आपल्याला घरी पाठवतील.''
न्यूझीलंडमध्ये सध्या ५९ कोरोना रुग्ण आहेत आणि एक काळ असा आलेला की किवी देशात १०० दिवस एकही रुग्ण सापडला नव्हता. नियमांचं काटेकोर पालन हे यामागचं मुख्य कारण आहे.