Join us

'किलर' मिलरची जलद शतकी खेळी; सेहवागचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला

याआधी हा रेकॉर्ड भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागच्या नावे होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 16:35 IST

Open in App

David Miller Fastest Century He Broke Virender Sehwags Record : दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक बॅटर डेविड मिलर याने न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात ऐतिहासिक शतक झळकावले. विक्रमी धावंसख्येचा पाठलाग करताना त्याने केलेली नाबाद शतकी खेळी व्यर्थ ठरली. पण त्याने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. याआधी हा रेकॉर्ड भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागच्या नावे होता.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

शेवटच्या चेंडूवर शतकी डाव साधला अन् विक्रम रचला

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा सेमी फायनल सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर रंगला होता. या सामन्यात न्यूझीलंडच्या संघानं पहिल्यांदा फलंदाजी करताना ६ बाद ३६२ धावा करत या स्पर्धेतील आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या आघाडीच्या फलंदाजीत कॅप्टन टेम्बा बवुमा आणि रेसी व्हॅन देर दुस्सेन यांची अर्धशतकी खेळी वगळता अन्य कुणालाही मैदानात तग धरता आला नाही. मॅच जिंकायला कुणी साथ द्यायला नसताना सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला डेविड मिलर या सामन्यात शेवटपर्यंत खेळत राहिला. एवढेच नाही तर डावातील अखेरच्या चेंडूवर त्याने ६७ चेंडूतील  शतकी खेळीसह खास विक्रमी डावही साधला.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील सर्वात जलद शतक

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात जलद शतक झळकवण्याचा नवा विक्रम डेविड मिलरनं सेट केला आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्ध ६७ चेंडूत नाबाद १०० धावा केल्या. याआधी हा विक्रम भारताच्या वीरेंद्र सेहवागच्या नावे होता. २००२ मध्ये सेहवागनं कोलंबोच्या मैदानात इंग्लंडविरुद्ध ७७ चेंडूत शतक झळकावले होते. यंदाच्या हंगामात जोश इंग्लिसनं ७७ चेंडूत शतक झळकावत सेहवागची बरोबरी केली होती. या यादीत आघाडीच्या फलंदाजांमध्ये शिखर धवनचाही नंबर लागतो. २०१३ मध्ये धवनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ८० चेंडूत शतक झळकावले होते. 

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सर्वात जलद शतक झळकवणारे फलंदाज

  • ६७ चेंडूत - डेविड मिलर (दक्षिण आफ्रिका) विरुद्ध न्यूझीलंड, लाहोर, २०२५
  • ७७ चेंडूत- वीरेंद्र सहवाग (भारत) विरुद्ध इंग्लंड, कोलंबो, आर, प्रेमदासा स्टेडियम, २००२
  • ७७ चेंडूत- जोश इंग्लिस (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध इंग्लंड, लाहोर, २०२५
  • ८० चेंडूत- शिखर धवन (भारत) विरुद्ध दक्षिणआफ्रिका, कार्डिफ, २०१३
  • ८७ चेंडूत- तिलकरत्ने दिलशान (श्रीलंका) विरुद्ध दक्षिण आफ्रिका, सेंच्युरीयन, २००९
टॅग्स :चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५भारत विरुद्ध न्यूझीलंडद. आफ्रिकाविरेंद्र सेहवाग