एडिनबर्ग : सध्या स्कॉटलंड आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये टी-२० मालिकेचा थरार रंगला आहे. सलग दुसऱ्या सामन्यात मिळवलेल्या विजयासह किवीच्या संघाने मालिकेवर देखील कब्जा केला आहे. एडिनबर्गमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने २५४ धावांचा डोंगर उभारून आपलाच विक्रम मोडला आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील ही न्यूझीलंडची सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. मर्यादित २० षटकांमध्ये न्यूझीलंडने मार्क चॅपमन आणि मायकल ब्रेसव्हेल यांच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर इतिहास रचला होता, ज्याच्या प्रत्युत्तरात स्कॉटलंडच्या संघाला ९ गडी गमावून केवळ १५२ धावा करता आल्या. अखेर किवीच्या संघाने १०२ धावांनी मोठा विजय मिळवला.
न्यूझीलंडची सांघिक खेळी
तत्पूर्वी, न्यूझीलंडच्या संघाने दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना किवीच्या संघाची सुरूवात निराशाजनक झाली. संघाचे सलामीवर फलंदाज प्रत्येकी २८ आणि ६ धावा करून माघारी परतले. मात्र चॅपमन (८३) धावांवर बाद झाल्यानंतर ब्रेसव्हेलने ६१ धावांची आक्रमक खेळी करून प्रतिस्पर्धी संघाला एक मोठे आव्हान दिले. डावाच्या शेवटी नीशमने केलेल्या २८ धावांच्या ताबडतोब फलंदाजीमुळे संघाने २५० धावांचा टप्पा पार केला.
एवढ्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना स्कॉटलंडच्या संघाला पूर्णपणे अपयश आले आणि १०२ धावांनी किवीच्या संघाने विजय मिळवला. या विजयासोबतच न्यूझीलंडच्या संघाने आपल्या दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वोच्च टी-२० धावसंख्या उभारून इतिहास रचला. यापूर्वी त्यांनी वेस्टइंडिजविरूद्ध २०१८ मध्ये ५ बाद २४३ धावा केल्या होत्या. तर अफगाणिस्तानच्या संघाने २०१९ मध्ये आयर्लंडविरूद्ध २७८ धावा करून जागतिक विक्रम केला होता.
मार्क चॅपमनची आक्रमक खेळी
मार्क चॅपमनने शेवटच्या वेळी २०२१ मध्ये टी-२० सामना खेळला होता, मात्र आता संधी मिळताच त्याने आक्रमक खेळी करून सर्वांचे लक्ष वेधले. चॅपमनने पॉपरप्लेपासूनच आक्रमक खेळी करण्यास सुरूवात केली. केवळ २७ चेंडूत अर्धशतक झळकावून स्कॉटलंडच्या गोलंदाजांना घाम फोडला. चॅपमनने ४४ चेंडूत कारकिर्दीतील सर्वोत्तम ८३ धावा केल्या. १६ व्या षटकात चॅपमन बाद झाला तेव्हा न्यूझीलंडची धावसंख्या ४ बाद १७५ एवढी होती.
Web Title: NZ vs SCO T20 New Zealand team has broken its own record by scoring 254 runs in 20 overs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.