Join us  

Finn Allen NZ vs SCOT : ट्वेंटी-२० मालिकेआधीच रोहित शर्माला धक्का; Martin Guptillने मोडला वर्ल्ड रेकॉर्ड; शतकवीर फिन अ‍ॅलनचा अजब विक्रम  

NZ vs SCOT T20I : वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी रोहित शर्मा ( Rohit Sharma) कालच कॅरेबियन बेटावर दाखल झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 9:34 PM

Open in App

NZ vs SCOT T20I : वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी रोहित शर्मा ( Rohit Sharma) कालच कॅरेबियन बेटावर दाखल झाला. २९ जुलैपासून ही मालिका सुरू होणार आहे, परंतु त्यापूर्वी भारताच्या कर्णधाराला मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा सलामीवर मार्टिन गुप्तील ( Martin Guptill) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड स्वतःच्या नावावर केला. स्कॉटलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० सामन्यात गुप्तीलने ४० धावांची खेळी करून भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर असलेला विक्रम मोडला. या सामन्यात फिन अ‍ॅलन यानेही शतकी खेळी करून अजब विक्रम नावावर केला आहे.

मार्टिन गुप्तीलने आजच्या ४० धावांच्या खेळीसह आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त ३३९९ धावांचा टप्पा ओलांडला. त्याने रोहितपेक्षा ( ३३७९) २० धावा अधिक केल्या आणि अव्वल स्थानी जाऊन बसला. गुप्तील ११६ ट्वेंटी-२० सामने खेळला आहे, तर रोहितच्या नावावर १२८ सामने आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत रोहितला पुन्हा एकदा या विक्रमात अव्वल स्थान पटकावण्याची संधी आहे. या विक्रमात माजी कर्णधार विराट कोहली ३३०८ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंग ( २८९४) व ऑस्ट्रेलियाचा अ‍ॅरोन फिंच ( २८५५) अनुक्रमे चौथ्या व पाचव्या क्रमांकावर आहेत. 

स्कॉटलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० सामन्यात न्यूजीलंडने ५ बाद २२५ धावा केल्या. परदेशातील किवींची ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली, तर ट्वेंटी-२० क्रिकेटमधील एकंदर चौथी सर्वोत्तम खेळी ठरली. या सामन्यात फिन  अ‍ॅलनने ५६ चेंडूंत ८ चौकार व ६ षटकारांच्या मदतीने १०१ धावा केल्या. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ( पुरुष/महिला) शतकानंतर यष्टीचीत होणारा अ‍ॅलन हा जगातील पहिला खेळाडू ठरला. किवींनी २०१८मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या मैदानावर ५ बाद २४३ धावा केल्या होत्या. त्यानंतर ऑकलंड येथे २०१८मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ६ बाद २४३ व २०२०मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ३ बाद २३८ धावा केल्या होत्या. 

टॅग्स :रोहित शर्माटी-20 क्रिकेटन्यूझीलंड
Open in App