NZ vs SL 1st Test : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथी व निर्णायक कसोटी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवली जात आहे. कसोटीचा दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू असून ऑस्ट्रेलियाने ४ बाद ३२८ धावा केल्या आहेत. उस्मान ख्वाजा १४३, तर कॅमेरून ग्रीन ८३ धावांवर खेळतोय... ही कसोटी जिंकणे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल गाठायची असेल तर भारताला अहमदाबादमध्ये विजयी पताका रोवावीच लागेल. तसे न झाल्यास सर्व गणित न्यूझीलंड-श्रीलंका यांच्यातल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेवर असेल. ऑस्ट्रेलियाने इंदूर कसोटी जिंकून WTC Final मध्ये आपली जागा निश्चित केली आहे.
अहमदाबाद कसोटीत भारतीय संघ सध्यातरी बॅकफूटवर पडलेला दिसतोय आणि ही कसोटी ड्रॉ किंवा भारताने गमावल्यास पुढील मार्ग अवघड होऊन बसेल. दुसरीकडे श्रीलंकेने पहिल्या कसोटीत मजबूत पकड घेतलेली पाहायला मिळतेय. श्रीलंकेने पहिल्या डावात ३५५ धावा केल्या आणि दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडचे पाच फलंदाज १६२ धावांवर माघारी परतले आहेत. कर्णधार दिमूथ करुणारत्ने ( ५०), कुसल मेंडिस ( ८७), अँजेलो मॅथ्यूज ( ४७), दिनेश चंडिमल ( ३९) व धनंजया डी सिल्वा ( ४६) या आघाडीच्या पाच फलंदाजांनी श्रीलंकेला मोठी धावसंख्या उभारून दिली. टीम साऊदीने ६४ धावांत ५ विकेट्स घेतल्या. मॅट हेन्रीने ८० धावांत ४ विकेट्स घेतल्या.
न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात चांगली झाली. टॉम लॅथम ( ६७) व डेव्हॉन कॉनवे ( ३०) यांनी अर्धशतकी भागीदारी केली, परंतु असिथा फर्नांडो ( २-४२) व लाहिरू कुमार ( २-३४) यांनी किवींना बॅकफूटवर फेकले. दुसऱ्या दिवसअखेर त्यांचे ५ फलंदाज १६२ धावांवर माघारी परतले असून अजून ते १९३ धावांनी पिछाडीवर आहेत.
श्रीलंकेने ही कसोटी जिंकल्यास काय?ऑस्ट्रेलियाने ६८.५२ टक्क्यांसह अंतिम फेरीतील स्थान पक्के केले आहे. भारताचे ६०.२९ टक्के व श्रीलंका ५३.३३ टक्क्यांसह अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहे. भारताने चौथी कसोटी जिंकल्यास त्यांचे भविष्य श्रीलंकेच्या कामगिरीवर असेल. पण, त्याचवेळी श्रीलंकेला दोन्ही कसोटी जिंकाव्या लागतील, तरच ते WTC Final खेळतील. यापैकी एकही कसोटी गमावल्यास किंवा ड्रॉ राहिल्यास भारतच अंतिम सामना खेळेल.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"