NZ vs SL: फिलिप्स-बोल्टसमोर आशियाई किंग्ज क्लिन बोल्ड; न्यूझीलंडचा ६५ धावांनी मोठा विजय! 

टी-२० विश्वचषकात न्यूझीलंडने श्रीलंकेला ६५ धावांनी पराभूत केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 05:03 PM2022-10-29T17:03:33+5:302022-10-29T17:04:18+5:30

whatsapp join usJoin us
NZ vs SL New Zealand beat Sri Lanka by 65 runs with Trent Boult taking 4 wickets and Glenn Phillips scoring a brilliant century  | NZ vs SL: फिलिप्स-बोल्टसमोर आशियाई किंग्ज क्लिन बोल्ड; न्यूझीलंडचा ६५ धावांनी मोठा विजय! 

NZ vs SL: फिलिप्स-बोल्टसमोर आशियाई किंग्ज क्लिन बोल्ड; न्यूझीलंडचा ६५ धावांनी मोठा विजय! 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. आज या स्पर्धेत न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात सामना पार पडला. न्यूझीलंडच्या डावात श्रीलंकेच्या घातक गोलंदाजीसमोर किवी संघ गारद झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र ग्लेन फिलिप्सने एकट्याने किल्ला लढवून शानदार शतक ठोकले. फिलिप्सच्या शतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने श्रीलंकेला १६८ धावांचे तगडे आव्हान दिले होते. ज्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ पूर्णपणे गारद झाला. ग्लेन फिलिप्सने ६४ चेंडूत १०४ धावांची शतकी खेळी करून आपल्या संघाला मोठा विजय मिळवून दिला. न्यूझीलंडच्या घातक गोलंदाजीसमोर श्रीलंकेचे फलंदाज चितपट झाले. अखेर श्रीलंकेचा संघ २० षटके देखील खेळू शकला नाही आणि १९.२ षटकांत १०२ धावांवर सर्वबाद झाला. न्यूझीलंडने ६५ धावांनी मोठा विजय मिळवला. 

न्यूझीलंडचा मोठा विजय 

तत्पुर्वी, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केन विलियमसनने घेतलेला निर्णय किवी संघालाच भारी पडला. कारण श्रीलंकेने पहिल्याच षटकांत सलामीवीर फिन लेनला स्वस्तात माघारी पाठवले. त्याच्यानंतर डेवोन कॉनवे (१), केन विलियमसन (८), डेरी मिचेल (२२) आणि जिमी नीशम (५) धावा करून बाद झाला. मात्र ग्लेन फिलिप्सने एकट्याने किल्ला लढवून ६४ चेंडूत १०४ धावांची शानदार खेळी केली. न्यूझीलंडने २० षटकांत ७ बाद १६७ धावा केल्या होत्या. श्रीलंकेकडून कसून रजिथाने सर्वाधिक २ बळी पटकावले. तर महेश थेक्षाना, धनंजया डी सिल्वा, वानिंदू हसरंगा आणि लाहिरु कुमार यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले. 

बोल्टसमोर आशियाई किंग्ज क्लिन बोल्ड 

१६८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरूवात निराशाजनक झाली. श्रीलंकेला पहिल्यापासून झटके बसत गेले. संघाची धावसंख्या १ असताना पाथुम निसंका बाद झाला, त्याच्यापाठोपाठ कुसल मेंडिस तंबूत परतला. कोणताच फलंदाज न्यूझीलंडच्या घातक गोलंदाजीचा सामना करण्यात यशस्वी झाला नाही. लक्षणीय बाब म्हणजे अवघ्या २४ धावांवर श्रीलंकेचा निम्मा संघ बाद झाला होता. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने ३५ धावांची सावध खेळी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र तोही संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. त्याला ट्रेन्ट बोल्टने बाहेरचा रस्ता दाखवला. त्याच्याव्यतिरिक्त भानुका राजपक्षेने २२ चेंडूत ३४ धावांची ताबडतोब खेळी केली मात्र लॉकी फर्ग्युसनने त्याला तंबूत पाठवले. न्यूझीलंडकडून ट्रेन्ट बोल्टने सर्वाधिक ४ बळी पटकावले. लक्षणीय बाब म्हणजे बोल्टने ४ षटकांत केवळ १३ धावा देऊन ४ बळी पटकावले. तर मिचेल सॅंटनरने आणि ईश सोधी यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. याशिवाय टीम साउदी आणि लॉकी फर्ग्युसन यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले. 

श्रीलंका आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ ग्रुप ए मध्ये आहेत. न्यूझीलंडच्या संघाने आज मिळवलेल्या विजयामुळे ५ गुणांसह उपांत्य फेरीकडे कूच केली आहे. त्यामुळे श्रीलंकेला उपांत्य फेरी गाठण्यासाठी आगामी सर्व सामने जिंकणे गरजेचे असतील. कारण श्रीलंकेचे आता केवळ २ गुण आहेत. तर ग्रुप ए मध्ये इंग्लंड, आयर्लंड आणि ऑस्ट्रेलिया ३ गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमाकांवर स्थित आहे. श्रीलंकेचा संघ क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर आहे. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"


 

Web Title: NZ vs SL New Zealand beat Sri Lanka by 65 runs with Trent Boult taking 4 wickets and Glenn Phillips scoring a brilliant century 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.