नवी दिल्ली : सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. आज या स्पर्धेत न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात सामना होत आहे. श्रीलंकेच्या घातक गोलंदाजीसमोर किवी संघ गारद झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र ग्लेन फिलिप्सने एकट्याने किल्ला लढवून शानदार शतक ठोकले. फिलिप्सच्या शतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने श्रीलंकेला आव्हानात्मक लक्ष्य दिले. न्यूझीलंडने २० षटकांत १६७ धावा केल्या. तर ग्लेन फिलिप्सने ६४ चेंडूत १०४ धावांची शतकी खेळी केली. न्यूझीलंडची सुरूवात निराशाजनक झाली होती मात्र फिलिप्सच्या शतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने श्रीलंकेला १६८ धावांचे तगडे आव्हान दिले आहे.
तत्पुर्वी, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केन विलियमसनने घेतलेला निर्णय किवी संघालाच भारी पडला. कारण श्रीलंकेने पहिल्याच षटकांत सलामीवीर फिन ॲलेनला स्वस्तात माघारी पाठवले. त्याच्यानंतर डेवोन कॉनवे (१), केन विलियमसन (८), डेरी मिचेल (२२) आणि जिमी नीशम (५) धावा करून बाद झाला. मात्र ग्लेन फिलिप्सने एकट्याने किल्ला लढवून ६४ चेंडूत १०४ धावांची शानदार खेळी केली. श्रीलंकेकडून कसून रजिथाने सर्वाधिक २ बळी पटकावले. तर महेश थेक्षाना, धनंजया डी सिल्वा, वानिंदू हसरंगा आणि लाहिरु कुमार यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले.
श्रीलंका आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ ग्रुप ए मध्ये आहेत. न्यूझीलंडचा संघ ३ गुणांसह ग्रुप ए च्या क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. तर श्रीलंकेचा संघ २ गुणांसह पाचव्या स्थानी स्थित आहे. त्यामुळे आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा असणार आहे. आज न्यूझीलंडने विजय मिळवला तर किवी संघ उपांत्यफेरीकडे कूच करेल. तर श्रीलंकेला आजचा विजय अव्वल स्थानी पोहचवेल.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"