भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा वनडे सामना उद्या खेळवण्यात येणार आहे. पण या सामन्यापूर्वीच भारताच्या एका खेळाडूने न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूचे कौतुक केले आहे. न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूला तर चक्क देवाची उपमा भारताच्या या खेळाडूने दिली आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या वन डे मालिकेतील अखेरचा सामना मंगळवारी खेळवण्यात येणार आहे. न्यूझीलंड संघानं पहिले दोन सामने जिंकून ही मालिका आधीच खिशात घातली आहे. त्यामुळे हा सामना यजमानांसाठी औपचारीक आहे, तर टीम इंडियाला इभ्रत वाचवण्यासाठी विजय मिळवणे अनिवार्य आहे. पण, यंदाच्या वर्षात वन डे क्रिकेट हे लक्ष्य नसल्याचे कोहलीनं आधीच स्पष्ट केलं आहे. यंदा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आहे आणि आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाही आहे. त्यामुळे ट्वेंटी-20 आणि कसोटीवर लक्ष केंद्रीत करण्याचा टीम इंडियाचा निर्धार आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात टीम इंडिया काही प्रयोग करू शकते. आगामी कसोटी मालिकेचे महत्त्व लक्षात घेता कर्णधार विराट कोहली विश्रांती घेऊ शकतो.
न्यूझीलंडनं पहिल्या वन डे सामन्यात टीम इंडियाचे 348 धावांचे लक्ष्य चार विकेट्स राखून पार केले. रॉस टेलरच्या शतकी खेळीनं किवींना मालिकेत आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सामन्यातही रॉस टेरलची बॅट तळपली. त्याला मार्टीन गुप्तीलचीही साथ लाभली. न्यूझीलंडच्या 273 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा डाव 251 धावांवर गडगडला. किवींनी 22 धावांनी हा सामना जिंकून मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. त्यामुळे वन डे मालिकेतील अखेरच्या सामन्यात टीम इंडिया काही युवा चेहऱ्यांना संधी देऊ शकते.
तिसऱ्या सामन्यापूर्वी भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर पत्रकार परिषदेमध्ये आला होता. त्यावेळी त्याने पत्रकारांच्या बऱ्याच पत्रकारांना उत्तरे दिली. यावेळी न्यूझीलंडच्या एका क्रिकेटपटूवर त्याने स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आहे. न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूला तर शार्दुलने देवाची उपमा दिली आहे.
शार्दुल म्हणाला की, " न्यूझीलंडने वनडे मालिकेत चांगली कामगिरी केली. सध्याच्या न्यूझीलंडचा रॉस टेलर हा भन्नाट फॉर्मात आहे. आतापर्यंत त्याने दमदार फलंदाजी केली आहे. माझ्यामते तर टेलर हा लेग साइडचा देव आहे. कारण लेग साइडला त्याने मारलेले फटके हे नजरेचे पारणे फेडणारे असतात."