भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात भारताला पराभवाचा धक्का बसला. भारतासाठी ही वाईट बातमी ठरली. पण त्यानंतर भारताला मोठा धक्का दिला आहे आणि हा धक्का दिला आहे तो आयसीसीने.
ट्वेंटी-20 मालिकेतील मानहानीकारक पराभव, कर्णधार केन विलियम्सला झालेली दुखापत या दुहेरी संकटातून वाट काढत यजमान न्यूझीलंड संघाने वन डे मालिकेत दणक्यात सुरुवात केली. भारताच्या 347 धावांच्या प्रत्युत्तरात किवी फलंदाजांनी सुरेख खेळ केला. कोणतीही घाई न करता त्यांनी हे लक्ष्य सहज पार केले. रॉस टेलर, हेन्री निकोल्स आणि कर्णधार टॉम लॅथम यांना या विजयाचे श्रेय द्यायला हवं. या विजयासह न्यूझीलंडनं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आजच्या सामन्यात भारताला पराबव स्वीकारावा लागाला. पण यापूर्वीही या मैदानात भारताला बरेच पराभव स्वीकारावे लागले आहेत.
पहिल्या पराभवाबद्दल कोहली म्हणाला की, " न्यूझीलंडने या सामन्यात चांगली कामगिरी केली. आम्हाला वाटले होते की, आम्ही उभारलेली धावसंख्या ही पुरेशी होती. पण रॉस टेलरसारखा अनुभवी फलंदाज न्यूझीलंडकडे होता. त्याचबरोबर टॉम लॅथमनेही चांगली फलंदाजी केली. या दोघांनी आमच्याकडून सामना हिरावून घेतला. त्यामुळे या विजयाचे श्रेय टेलर आणि लॅथम यांना जाते."
या पराभवानंतर बऱ्याच जणांनी भारतीय संघावर टीका केली आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीने या पराभवामागील कारणंही स्पष्ट केले आहे. या सर्व गोष्टीमधून जात असताना आता भारताला आयसीसीने मोठा धक्का दिला आहे. हा धक्का नेमका आहे तरी काय...
आयसीसीने भारतीय संघावर सामन्यानंतर दंड ठोठावला आहे. भारतीय संघाने निर्धारीत वेळेनंतर चार षटके टाकली होती. या षटकांसाठी आयसीसीने भारताय संघातील खेळाडूंच्या मानधनावर ८० टक्के दंड ठोठावला आहे. निर्धारीत वेळेनंतर टाकलेल्या प्रत्येक षटकासाठी खेळाडूंच्या मानधनातून २० टक्के रक्कम दंड म्हणून वसूल केली जाते.