भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला वनडे सामना चांगलाच रंगला होता. पण अखेर न्यूझीलंडने या सामन्यात अखेर बाजी मारली. पण हॅमिल्टनमध्ये भारताला आतापर्यंत फक्त एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे आता पराभूत कर्णधारांच्या यादीत विराट कोहलीचेही नाव जोडले गेले आहे.
ट्वेंटी-20 मालिकेतील मानहानीकारक पराभव, कर्णधार केन विलियम्सला झालेली दुखापत या दुहेरी संकटातून वाट काढत यजमान न्यूझीलंड संघाने वन डे मालिकेत दणक्यात सुरुवात केली. भारताच्या 347 धावांच्या प्रत्युत्तरात किवी फलंदाजांनी सुरेख खेळ केला. कोणतीही घाई न करता त्यांनी हे लक्ष्य सहज पार केले. रॉस टेलर, हेन्री निकोल्स आणि कर्णधार टॉम लॅथम यांना या विजयाचे श्रेय द्यायला हवं. या विजयासह न्यूझीलंडनं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आजच्या सामन्यात भारताला पराबव स्वीकारावा लागाला. पण यापूर्वीही या मैदानात भारताला बरेच पराभव स्वीकारावे लागले आहेत.
भारतीय संघ २०१९ सालीही या मैदानात एकदिवसीय सामना खेळला होता. त्यावेळी भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवण्यात आले होते. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा चौथा एकदिवसीय सामना होता. या सामन्यात भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करताना फक्त ९२ धावाच करता आल्या होत्या. न्यूझीलंडने हे आव्हान पंधरा षटकांत पूर्ण केले होते.
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २०१४ साली या मैदानात वनडे सामना खेळला होता. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २७८ धावा केल्या होत्या. या सामन्यात धोनी आणि रोहित यांनी प्रत्येकी ७९ धावांची खेळी साकारली होती. जडेजानेही फटकेबाजी करत ६२ धावांची खेळी साकारली होती. पण न्यूझीलंडने हा सामना सात विकेट्स राखून सहजपणे जिंकला होता.
धोनीच्या नेतृत्वाखाली हॅमिल्टनच्या सीडेन पार्कमध्ये २०१४ साली दोन वनडे सामने खेळले होते. दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने सात विकेट्स गमावत २७१ धावा केल्या होत्या. या सामन्यात डकवर्थ लुईस नियमांनुसार भारतीय संघाला १५ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. यापूर्वी भारताला २००३ साली सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर १९८१ साली झालेल्या सामन्यातही भारताला विजयापासून वंचित राहावे लागले होते. त्यावेळी भारताचे कर्णधारपद गुंडप्पा विश्वनाथ यांच्याकडे सोपवण्यात आले होते.
भारताला हॅमिल्टनमध्ये मिळालेला एकमेव विजयहॅमिल्टनमध्ये भारताला एकमेव विजय २००९ साली मिळाला होता. यावेळी भारतीय संघाचे कर्णधारपद धोनीकडे होते. न्यूझीलंने प्रथम फलंदाजी करताना २७० धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने एकही विकेट न गमावता २०१ धावा केल्या होत्या. पण त्यानंतर पाऊस पडायला लागला आणि बराच वेळ सुरु होता. त्यामुळे डकवर्थ लुईस नियमांनुसार भारतावा ८४ धावांनी विजयी घोषित करण्यात आले होते. या सामन्यात वीरेंद्र सेहवागने शतक झळकावले होते.