मुंबई : ‘माझी कारकीर्द सहज घडलेली नाही. जे मिळविले ते सोपे नव्हतेच. अनेक अडथळे आले, पण क्रिकेटवरील प्रेम मला पुढे नेत राहिले.’ माजी कर्णधार आणि सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे(एनसीए)प्रमुख राहुल द्रविड यांनी मंगळवारी स्वत:च्या कारकिर्दीला उजाळा देत या आठवणी कथन केल्या.एका संस्थेने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत द्रविड हे वक्ते होते. सत्यकथन असे नाव असलेल्या या व्याख्यानमालेत त्यांची मुलाखत लोकमतचे Lकन्सल्टिंग एडिटर असलेले प्रसिद्ध क्रीडा पत्रकार अयाज मेमन यांनी घेतली. तुम्ही कसे घडलात, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर स्वत:च्या क्रिकेट कारकिर्दीला उजाळा देत राहुल पुढे म्हणाले, ‘एखादी व्यक्ती कुठल्याही क्षेत्रात पुढे जायचे ठरवते तेव्हा ती वाटचाल सोपी नसते. विशेषत: खेळात तर अतिशय कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागते. माझ्या वाटचालीतही अनेक चढ-उतार आले. तथापि, क्रिकेटप्रति असलेले वेड मला पुढे नेत गेले. मी नेहमी माझ्याकडून सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न केला.एक क्रिकेटपटू म्हणून नव्हे तर एक व्यक्ती म्हणून मी कोचिंगचे क्षेत्र निवडले, असेही राहुल यांनी स्पष्ट केले. स्वत:चा मुद्दा स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, मी आज जो काही आहे तो खेळामुळेच. क्रिकेटमुळे सर्वप्रकारच्या भावना जाणून घेता आल्या. चांगले काय आणि वाईट काय, हे देखील क्रिकेटमुळेच अवगत झाले. खेळात तुमच्यावर प्रकाशझोत असतो. अपयश ताबडतोब जनतेपर्यंत पोहोचते. या गोष्टींपासून जो अनुभव मिळतो त्याचा अधिक अभिमान बाळगण्याची गरज नाही. सध्याच्या स्पर्धात्मक युगात खेळाडू म्हणून सामान्य जगणे अधिक कठीण झाले आहे.’ वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात मार्गदर्शक तत्त्व काय आहेत, या प्रश्नाच्या उत्तरात द्रविड म्हणाले, ‘प्रामाणिकपणे बोलायचे तर मी काही फार मोठा माणूस नाही. माझ्यासमक्ष जे काम असेल ते प्रामाणिकपणे पार पाडणे हे कर्तव्य मानतो. काही वेळेसाठी माझ्याकडे क्रिकेट शिकविण्याचे काम आहे. मी ज्यावेळी हे काम सोडून देईल, त्यावेळी भारतीय क्रिकेटने शिखर गाठलेले पाहताना मला निश्चितच आवडेल. भारतीय खेळाडू आणि खेळ यशोशिखरावर पोहोचावा, इतकीच माझी आकांक्षा आहे.
१९ वर्षांखालील विश्वचषक जिंकल्यानंतर उत्पन्न झालेल्या वादाबाबतही मेमन यांनी राहुल यांना बोलते केले. त्यावेळी द्रविड यांना सपोर्ट स्टाफच्या तुलनेत अधिक बक्षीस रक्कम मिळणार होती. यावर त्यांनी स्वत:च्या भावना आणि विचार व्यक्त करताना बक्षिसाची रक्कम सर्वांमध्ये समान प्रमाणात वाटली जावी, असे म्हटले होते. राहुल यांच्या मते, सपोर्ट स्टाफ विजयी वातावरणनिर्मिती करण्यात आघाडीवर असतो. प्रत्येकाने आपापले योगदान दिल्याने केवळ मला अधिक रक्कम मिळणे योग्य नाही, अशी माझी त्यावेळी धारणा झाली होती.’