मुंबई - कालच आटोपलेल्या ब्रिस्बेन कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सनसनाटी विजय मिळवत बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत भारतीय संघाने ऐतिहासिक यशाची नोंद केली होती. मात्र भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवण्याजोगी कामगिरी केल्यानंतर विजेत्याच्या थाटात मायदेशी परतण्यास उत्सुक असलेल्या भारतीय संघाच्या मायदेशी परतण्याच्या वाटेत मोठी अडचण निर्माण झाली आहे. ऑस्ट्रेलियावरून परतणाऱ्या भारतीय संघाचे विमान कुठे उतरवायचे यावरून घोळ सुरू झाला आहे.बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला २-१ अशी धूळ चारल्यानंतर भारतीय संघ आता मायदेशी रवाना होणार आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियातून दुबई मार्गे भारतात येईल. मात्र भारतीय संघाला घेऊन येणारे विमान कुठे उतरवायचे यावरून घोळ निर्माण झाला आहे. सध्या कोविड आणि क्वारेंटाइनच्या नियमांमुळे बाहेरून येणाऱ्या विमानाला मुंबईत उतरण्यास महाराष्ट्र सरकारने अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यामुळे भारतीय संघाला घेऊन येणारे विमान मुंबईत उतरवायचे की चेन्नईत उतरवायचे यावरून चर्चा सुरू आहे. या सर्वामुळे भारतीय संघाच्या मायदेशी परतण्याला उशीर होऊ शकतो. या संदर्भातील वृत्त टीव्ही ९ ने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाहून परतणाऱ्या भारतीय संघाला काही दिवसांतच मायदेशी होणाऱ्या कसोटी मालिकेत इंग्लंडशी दोन हात करावे लागणार आहेत. ही मालिका ५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिले दोन कसोटी सामने हे चेन्नईत होणार आहेत. त्यामुळे भारतीय संघाला चेन्नईत उतवण्याबाबतही चर्चा सुरू आहे. दरम्यान, या मालिकेपूर्वी २७ जानेवारीपासून भारतीय संघाला बायो बबलमध्ये जावे लागणार आहे.