Odean Smith 5 sixes Video: सध्या वेस्ट इंडिजमध्ये कॅरेबियन प्रिमियर लीगचा दंगा सुरू आहे. या लीगमध्ये प्रत्येक सामन्यात तुफान फटकेबाजी पाहायला मिळते. नुकत्याच झालेल्या Guyana Amazon Warriors vs Jamaica Tallawahs यांच्या सामन्यात धमाकेदार फलंदाजी पाहायला मिळाली. गुयाना संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १७८ धावा केल्या. या खेळीला प्रत्यु्त्तर देताना ब्रँडन किंगने दमदार शतक ठोकले पण त्याला इतर खेळाडूंची साथ मिळाली नाही. त्यामुळे जमैका संघाला २० षटकांत १६६ धावाच करता आल्या. तडाखेबाज फलंदाज ओडियन स्मिथने गुयानाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. त्यातही विशेष आकर्षण ठरले ते एकाच षटकात त्याने मारलेले पाच षटकार...
गुयाना संघाची गोलंदाजी सुरू असताना १८वे षटक टाकण्यासाठी प्रिटोरियस आला. ओडियन स्मिथ त्यावेळी स्ट्राईकवर होता. पहिल्या चेंडूवर त्याने उत्तुंग असा षटकात लगावला. दुसरा चेंडू निर्धाव गेला. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर पुन्हा ओडियन स्मिथने षटकार लगावला. पहिल्या तीन चेंडूत दोन षटकार आल्यानंतर गोलंदाजाची लाईन बिघडली. त्यामुळे एक चेंडू वाईड गेला. पण त्याचा ओडियन स्मिथवर काहीच परिणाम झाला नाही. त्यापुढचे तीनही चेंडू ओडियन स्मिथने हवाईमार्गे थेट सीमारेषेबाहेर पाठवले आणि प्रिटोरियच्या गोलंदाजीचा यथेच्छ समाचार घेतला. पाहा व्हिडीओ-
--
दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना गुयाना अमेझॉन वॉरियर्सच्या संघाने चांगली फटकेबाजी केली. शाई होप याने संयमी फटकेबाजी केली. ४५ चेंडूत त्याने ६० धावा केल्या. त्यानंतर शेवटच्या टप्प्यात ओडियन स्मिथ आणि किमो पॉल यांनी दमदार फलंदाजी केली. ओडियन स्मिथने १६ चेंडूत ४२ तर किमो पॉलने १२ चेंडूत नाबाद २४ धावा केल्या. त्यामुळे गुयानाने १७८ धावांपर्यंत मजल मारली. जमैकाचा संघाला मात्र हे आव्हान पेलले नाही. ब्रँडन किंगने सलामीला येत ६६ चेंडूत धुवाँधार शतकी खेळी केली. त्याने १०४ धावा कुटल्या. पण त्याला इतर फलंदाजांची साथ मिळू शकली नाही. किंगच्या शतकी खेळी व्यतिरिक्त दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम खेळी करणाऱ्या कर्क मॅकेन्झीने मात्र केवळ १५ धावाच केल्या होत्या. त्यामुळे १६६ धावांत त्यांचा डावा संपुष्टात आला.