रोहित नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : टी-२० क्रिकेटमुळे विशेषत: टी-२० लीगमुळे जगभरात एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट खालावत चालले आहे. टी-२० अत्यंत रोमांचक आणि करमणुकीचे ठरत असल्याने जगभरात टी-२० ला अधिक पाठिंबा मिळत आहे, असे मत श्रीलंकेचा अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश चंदिमल याने व्यक्त केले.
भारताविरुद्ध शनिवारपासून रंगणाऱ्या टी-२० मालिकेआधी चंदिमलने ‘लोकमत’शी विशेष संवाद साधला. जगभरात झपाट्याने लोकप्रिय होत असलेल्या टी-२० बाबत चंदिमल म्हणाला की, ‘टी-२० क्रिकेटमुळे प्रेक्षकांना रोमांचक अनुभव मिळतो. त्यामुळे सध्या एका ठिकाणी बसून दिवसभर कसोटी क्रिकेट पाहणे चाहत्यांना कठीण होत आहे.’
सोनी स्पोर्ट्सच्या वतीने चंदिमल पुढे म्हणाला की, ‘खेळाडू म्हणून आम्हाला ही परिस्थिती समजून स्वीकारावी लागेल. पण, माझ्या मते कसोटी क्रिकेट जास्त प्रमाणात खेळले गेल्यास आपण क्रिकेटचा स्तर कायम राखू. टी-२०द्वारे करमणूक होते, तर कसोटी क्रिकेटद्वारे दर्जेदार खेळ अनुभवता येतो.’
दोन्ही संघ या मालिकेत नव्या कर्णधारासह खेळणार आहेत. भारताचे नेतृत्व सूर्यकुमार यादव, तर श्रीलंकेचे नेतृत्व चरिथ असलंका करणार आहे. चंदिमल म्हणाला की, ‘सूर्यकुमारमध्ये गुणवत्ता ठासून भरलेली आहे.
तो असा खेळाडू आहे, जो एक किंवा दोन षटकांमध्ये सामना फिरवू शकतो. तसेच, मैदानावर तो शांत असतो. त्यामुळे त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाचे भविष्य उज्ज्वल आहे. दुसरीकडे, असलंका हा खरा लीडर आहे. त्याने १७ आणि १९ वर्षांखालील संघाचे नेतृत्व केले आहे. त्याने आतापर्यंत श्रीलंका क्रिकेटसाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्याच्या नेतृत्वाचा श्रीलंकेला मोठा फायदा होईल.’
आमच्यासाठी मोठी संधी
रोहित शर्मा, विराट कोहली यांची अनुपस्थिती आमच्यासाठी संधी असल्याचे चंदिमलने म्हटले. त्याने सांगितले की, ‘टी-२० मध्ये रोहित-कोहली यांची अनुपस्थिती आमच्यासाठी खरंच मोठी संधी असेल. कारण, दोघांचे टी-२० क्रिकेटमधील योगदान सर्वांना माहिती आहे. त्यांच्याकडे खूप मोठा अनुभव होता. अनुभवाच्या बाबतीत आता दोन्ही संघ तुल्यबळ असून आम्ही या मालिकेसाठी खूप उत्सुक आहोत.’
मधल्या फळीत धोकादायक फटकेबाजी
चंदिमलने भारताविरुद्ध आतापर्यंत १० सामने खेळताना ९७.३च्या स्ट्राइक रेटने १४७ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने ३५ धावांची सर्वोत्तम खेळी केली आहे. मधल्या फळीतील त्याची फटकेबाजी प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध कायम धोकादायक ठरते. त्याने श्रीलंकेकडून एकूण ६८ टी-२० सामने खेळताना १०३.६०च्या स्ट्राइक रेटने १०६२ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने ६ अर्धशतकी खेळी केली असून नाबाद ६६ धावांची त्याची सर्वोत्तम खेळी आहे.