ODI world cup 2023 । नवी दिल्ली : भारतात होणाऱ्या विश्वचषकाच्या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) तयारीला लागले असून देशातील पाच स्टेडियमचा कायापालट होणार आहे. आगामी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून बीसीसीआयची ओळख आहे. पण मध्यंतरी भारताला खराब खेळपट्टीमुळे आयसीसीने सुनावले होते. भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेदरम्यान भारताला खराब खेळपट्टीमुळे आयसीसीला स्पष्टीकरण द्यावे लागले होते. अशातच आता बीसीसीआयने देशभरातील प्रमुख पाच स्टेडियमच्या विकासासाठी ५०० कोटी खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे.
वर्ल्ड कपसाठी BCCI ची खास तयारीवृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, मोहाली आणि मुंबईतील स्टेडियमला अधिक चांगले करण्यासाठी बीसीसीआय पावले उचलत आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर कामाला सुरूवात झाली आहे, पाचही मैदानांच्या नूतनीकरणाच्या या कामावर कोट्यवधी रुपये खर्च केले जाणार आहेत. दिल्ली स्टेडियममधील या प्रकल्पासाठी १०० कोटी रुपये, हैदराबादसाठी ११७ कोटी. ईडन गार्डन्सवर १२७ कोटी, मोहाली ७९.४६ कोटी आणि वानखेडे स्टेडियमवर ७८. ८२ कोटी रुपये खर्च होणार आहेत.
विश्वचषकाच्या स्पर्धेसाठी १२ ठिकाणांची निवड करण्यात आली असून त्यात अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, धर्मशाला, गुवाहाटी, हैदराबाद, कोलकाता, लखनौ, इंदूर, राजकोट आणि मुंबई यांचा समावेश आहे. विश्वचषकादरम्यान 46 दिवसांत 48 सामने खेळवले जातील, भारतात शेवटचा वन डे विश्वचषक 2011 मध्ये झाला होता, जेव्हा संघाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली विजेतेपद पटकावले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"