ODI World Cup Final 2023 Pitch Rating: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषक फायनलसाठी खेळपट्टीला 'सरासरी' रेटिंग दिले आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर १९ नोव्हेंबरला अंतिम सामना खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा गडी राखून पराभव केला. कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीच्या खेळपट्टीलाही 'सरासरी' रेटिंग देण्यात आले आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याच्या खेळपट्टीवर, ज्यावर बराच वाद झाला होता, त्याला मात्र 'चांगले' रेटिंग देण्यात आले आहे.
१९ नोव्हेंबरला नरेंद्र मोदी स्टेडियमच्या जुन्या खेळपट्टीवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषक फायनल झाली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली होती, त्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम खेळण्यासाठी आलेल्या टीम इंडियाला 50 षटकांत केवळ 240 धावा करता आल्या. यानंतर कांगारू संघाचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने 120 चेंडूत 137 धावांच्या जोरावर अवघ्या 43 षटकांत लक्ष्य गाठले. तर विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला 49.4 षटकांत 212 धावांत गुंडाळले आणि त्यानंतर 47.2 षटकांत सात विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. यासह पाच सामन्यांचे रेटिंग सरासरी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पाच सामन्यांची खेळपट्टी 'सरासरी'
टीम इंडियाने वर्ल्ड कपमध्ये एकूण 11 सामने खेळले. आयसीसीने यातील पाच सामन्यांमध्ये खेळपट्टीला सरासरी रेटिंग दिले आहे. फायनल व्यतिरिक्त यजमान संघाच्या कोलकाता येथील दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, लखनौमधील इंग्लंड, अहमदाबादमधील पाकिस्तान आणि चेन्नईतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यांच्या खेळपट्ट्यांना 'सरासरी' मानांकन देण्यात आले. वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड कप सेमीफायनलची खेळपट्टी एका मोठ्या वादाच्या केंद्रस्थानी होती. त्यास चांगले नामांकन मिळाले आहे. शेवटच्या क्षणी बदल करण्यात आल्याने त्याला 'चांगले' मानांकन मिळाले असल्याचा दावा करण्यात आला आहे. विश्वचषका दरम्यान, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान विरुद्धच्या भारताच्या सामन्यातील दोन खेळपट्ट्यांच्या आयसीसीच्या रेटिंगवर टीका केली होती.
अँडी पायक्रॉफ्ट आणि जवागल श्रीनाथ यांनी दिले खेळपट्टीचे रेटिंग
अंतिम सामन्यासाठी खेळपट्टीचे रेटिंग आयसीसी सामनाधिकारी आणि झिम्बाब्वेचा माजी फलंदाज अँडी पायक्रॉफ्ट यांनी दिले आहे. तर दुसऱ्या उपांत्य फेरीसाठी खेळपट्टीचे रेटिंग माजी भारतीय वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथने दिले आहे.