पणजी : स्वीत बेउरा हिच्या नाबाद ४४ धावांच्या खेळीच्या जोरावर ओडिशा संघाने तामिळनाडूचा २ गडी राखून पराभव केला. याबरोबरच त्यांनी बीसीसीआय आयोजित १९ वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत विजय नोंदवला. हा सामना गोवा क्रिकेट संघटनेच्या पर्वरी येथील जीसीए मैदानावर खेळविण्यात आला.सामन्यात तामिळनाडूने ५० षटकांत ९ बाद १६२ धावा केल्या होत्या. हे आव्हान ओडिशाच्या महिला संघाने ४८.४ षटकांत ८ गडी गमावून गाठले. स्वीत बेउरा हिने नाबाद ४४ धावांची खेळी केली. यामध्ये तिच्या ५ चौकारांचा समावेश आहे. तामिळनाडूने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली होती. त्यांच्याकडून कर्णधार एस. बी. किथाना हिने सर्वाधिक नाबाद ७६ धावांची खेळी केली. तिने आपल्या खेळीत ६ चौकार फटकारले. शूशंथिकाने १२, एलोक्सीने १० तर राम्याश्रीने १७ धावांचे योगदान दिले. इतर फलंदाज मात्र द्विअंकी धावसंख्याही गाठू शकले नाही. त्यामुळे तामिळनाडूला १६२ धावांवर समाधान मानावे लागले. ओडिशाकडून सुभ्रा स्वेन हिने २४ धावांत २ तर इंद्रानी आणि सोनालीने प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरात, ओडिशाकडून सलामीवीर काजल जेना हिने १३, रस्मिता हिने १२, पुनम नायक ३३, तरन्ना हिने २२ धावांचे योगदान दिले. यामध्ये सर्वात महत्त्वाचे योगदान स्वीत हिचे ठरले. तिची नाबाद खेळी ओडिशाला जिंकून देणारी ठरली. तामिळनाडूकडून राम्याश्री हिने सर्वाधिक ३ बळी घेतले.
गुजरातचा ८२ धावांनी विजयमडगाव क्रिकेट क्लबच्या मैदानावर झालेल्या सामन्यात गुजरात संघाने त्रिपुराचा ८२ धावांनी पराभव केला. या सामन्यात गुजरातने ५० षटकांत ७ बाद १४६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, त्रिपुरा संघाला केवळ ६४ धावाच करता आल्या. गुजरातकडून आय. पटेल हिने सर्वाधिक ४६ धावांची खेळी केली. तान्या पटेल हिने नाबाद २२ धावांचे योगदान दिले. त्रिपुराकडून अंबिका देबनाथ (१८) हिनेच द्विअंकी धावसंख्या गाठली. इतर ९ फलंदाजांना योगदान देता आले नाही त्यामुळे त्यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. त्रिपुराचा हा स्पर्धेतील दुसरा पराभव ठरला. याआधी, गोव्याने त्रिपुरावर मात केली होती.