मुंबई : भारताच्या कनिष्ठ संघाचे प्रशिक्षक आणि महान फलंदाज राहुल द्रविड आता युवा खेळाडूंना घडवण्याचे काम पाहणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) त्याची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रुमखपदी निवड केल्याचे, सोमवारी जाहीर केले. या अकादमीत द्रविड युवा खेळाडूंना, प्रशिक्षकांना मार्गदर्शन करणे, सराव करून घेणे, शिवाय खेळाडू, प्रशिक्षक व साहाय्यक खेळाडूंना मार्गदर्शन करण्याची भूमिका पार पाडणार आहे. 46 वर्षीय द्रविड हा राष्ट्रीय महिला व पुरुष संघांसोबतही काम करणार आहे. शिवाय भारत A, 19 व 23 वर्षांखालील संघांच्या विकासात द्रविडचा हातभार असणार आहे.
द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारताने 19-वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला होता. मुंबईचा पृथ्वा शॉ हा या संघाचा कर्णधार होता. द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ संघ चांगली कामगिरी करत होता. पण आता द्रविडकडे आणखी मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. द्रविड 1 जुलैलाच पदभार स्वीकारणार होता, परंतु प्रशासकिय समितीनं त्याला इंडिया सिमेंट कंपनीच्या उपाध्यक्षपदामुळे ते लांबणीवर पडले. प्रशासकिय समितीनं हितसंबंध जपण्याचा मुद्दा समोर ठेवताना द्रविडला इंडिया सिमेंट कंपनीचा पदभार सोडण्यास किंवा कार्यकाळ संपेपर्यंत या पदापासून दूर राहण्यास सांगितले होते. इंडिया सिमेंटने द्रविडची सुट्टी मंजूर केली असून तो आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रुमखपदाचा पदभार स्वीकारण्यासाठी मोकळा झाला आहे.
'' राहुल द्रविड हे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदी असतील आणि येथील सर्व काम त्यांच्या मार्गदर्शनाखालीच होईल,'' असे बीसीसीआयनं त्यांच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.