लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघ रविवारी इंग्लंडविरुद्ध निळ्या जर्सीत नाही तर भगव्या जर्सीत दिसणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अखेर अधिकृत घोषणा केली. भारतासाठी निळी जर्सी लकी असल्याचेही काही जण म्हणतात. पण आता इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताला निळ्या जर्सीने खेळता येणार नाही. भारत आणि इंग्लंड यांचा सामना 30 जूनला होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ 'ऑरेंज जर्सी' परीधान करणार आहे. आतापर्यंत या 'ऑरेंज जर्सी'बाबत बरीच चर्चा झाली. पण या 'ऑरेंज जर्सी'चा लूक नेमका कसा असेल, हे कोणालाही माहिती नव्हते. पण आज या 'ऑरेंज जर्सी'चे अनावरण करण्यात आले आणि तिचा पहिला लूक पाहायला मिळाला.
आतापर्यंत भारताने वर्ल्ड कप स्पर्धेत निळ्या रंगाच्या शेड्सच्या जर्सी परीधान केल्या आहेत. पण इंग्लंडचीही जर्सी निळ्या रंगाची असल्यामुळे भारताला त्यांच्यी जर्सीचा रंग बदलावा लागणार आहे. सध्याच्या घडीला भारतीय संघ निळ्या रंगाची जर्सी परीधान करत असला तरी कॉलर मात्र ऑरेंज रंगाची आहे. पण इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ही रंगसंगती उलटी झाली आहे. इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाच्या जर्सीचे हात ऑरेंज रंगाचे, तर कॉलर निळ्या रंगाची आहे.