ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडिया घरच्या मैदानावर इंग्लंडचे गर्वहरण करण्यासाठी तयार होत आहे. BCCIनं इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठीचा संघ मंगळवारी जाहीर केला. पितृत्व रजेवर गेलेल्या विराट कोहली (Virat Kohli) चे संघात पुनरागमन झाले असून त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या कसोटीनंतर विराट पत्नी अनुष्का शर्माच्या बाळंतपणासाठी मायदेशी परतला होता. त्यामुळे त्याला तीन कसोटींना मुकावे लागले होते. पण, आता विराट इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून पुनरागमन करणार आहे. या मालिकेपूर्वी टीम इंडियाच्या कर्णधाराला मोठा धक्का बसला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून माघार घेतल्यानं विराटची आयसीसी कसोटी क्रमवारीत ( ICC Test batsmen's rankings) आधीच घसरण झाली होती. त्यात बुधवारी जाहीर झालेल्या क्रमवारीत विराटची फलंदाजांच्या क्रमवारीत आणखी घसरण झाली आहे. तो एक स्थान खाली घसरला आहे. ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशेननं विराटचे तिसरे स्थान पटकावले. इंग्लंडचा कर्णधार जो रूट यानं श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत द्विशतक झळकावले होते आणि त्यामुळे त्यानं सहा क्रमांकाच्या सुधारणेसह टॉप फाईव्हमध्ये प्रवेश केला. टीम इंडियाचा चेतेश्वर पुजारा सातव्या स्थानी आला आहे. अजिंक्य रहाणेची दोन स्थानांनी घसरण झाली आहे.
२८ नोव्हेंबर २०१६नंतर विराट कोहली प्रथमच टॉप थ्रीमधून बाहेर फेकला गेला आहे. १५१४दिवसांनंतर त्याची अव्वल तीन स्थानाबाहेर घसरण झाली.
गोलंदाजांच्या क्रमवारीत आर अश्विन व जसप्रीत बुमराह एका स्थानेच्या सुधारणेसह अनुक्रमे ८व्या व ९व्या स्थानावर आले आहेत.
रिषभ पंतनं मोठी झेप घेतली आहे. तो १३व्या स्थानावर पोहोचला आहे आणि जगातील यष्टिरक्षकांमध्ये तो टॉपवर आहे. टॉप ५० मध्ये भारताचे ८ फलंदाज आहेत. विराट कोहली ( ८६२ गुण) चौथ्या, चेतेश्वर पुजारा ( ७६०) सातव्या, अजिंक्य रहाणे ( ७४८) ९व्या, रिषभ पंत ( ६९१) १३व्या, रोहित शर्मा ( ६६०) १८व्या, मयांक अग्रवाल ( ६२५) २४व्या, रवींद्र जडेजा ( ५७८) ३३व्या आणि शुबमन गिल ( ५३३) ४८व्या स्थानावर आहेत. अष्टपैलू खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजा आणि आर अश्विन हे दोन भारतीय आहेत. जडेजाची तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे, तर अश्विन सहाव्या क्रमांकावर आहे.
हार्दिक, ईशांतचे पुनरागमन, अक्षर पटेल कसोटी संघात; इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाची निवड
ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट गोड केल्यानंतर भारतीय संघाला ५ फेब्रुवारीपासून इंग्लडविरुद्ध मायदेशात मालिका खेळायची आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील नवीन निवड समितीने १८ खेळाडूंचा संघ मंगळवारी जाहीर केला.
भारतीय संघ - सलामीवीर : रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, मधली फळी : चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे आणि लोकेश राहुल, यष्टीरक्षक : ऋषभ पंत, वृद्धिमान साहा, अष्टपैलू : हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, फिरकीपटू : आर. अश्विन, कुलदीप यादव, वेगवान गोलंदाज : जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर, नेट बॉलर : अंकित राजपूत, आवेश खान, संदीप वारियर, के. गौतम आणि सौरभ कुमार, राखीव खेळाडू : के. एस. भरत (यष्टीरक्षक), शाहबाज नदीम, राहुल चाहर आणि अभिमन्यू ईश्वरन.