Join us  

ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशाला BCCI चा विरोध ?

दर चार वर्षांनी होणा-या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताला तीन ते चार पदकांवर समाधान मानावे लागते. मागच्या वर्षी रिओ ऑलिम्पिकमध्ये तर, भारताला फक्त दोन पदके मिळाली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2017 2:25 PM

Open in App
ठळक मुद्दे भारतामध्ये क्रिकेट व्यतिरिक्त अन्य क्रीडा प्रकारांना पोषक वातावरण नसल्याची नेहमीच टीका केली जाते. क्रिकेट हा ऑलिम्पिकचा क्रीडा प्रकार नाही असे बीसीसीआयचे ठाम मत आहे. भारताला आणखी एक पदक मिळण्याची शक्यता वाढेल.

नवी दिल्ली, दि. 31 - दर चार वर्षांनी होणा-या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताला तीन ते चार पदकांवर समाधान मानावे लागते. मागच्या वर्षी रिओ ऑलिम्पिकमध्ये तर, भारताला फक्त दोन पदके मिळाली होती. भारतामध्ये क्रिकेट व्यतिरिक्त अन्य क्रीडा प्रकारांना पोषक वातावरण नसल्याची नेहमीच टीका केली जाते. क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश केला तर, भारताला आणखी एक पदक मिळण्याची शक्यता वाढेल. पण ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करायला दुस-या तिस-या कोणाचा नव्हे तर, चक्क बीसीसीआयचाच विरोध आहे. 

आयसीसीकडून 2024 च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या टी-20  प्रकाराचा समावेश करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पण त्यासाठी आयसीसीला भारतीय क्रिकेट बोर्डाची साथ हवी आहे. क्रिकेट हा ऑलिम्पिकचा क्रीडा प्रकार नाही असे बीसीसीआयचे ठाम मत आहे. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशासाठी आयसीसी प्रयत्न करत असल्याचे आम्ही ऐकून आहोत पण बहुतांश सदस्य त्याबद्दल फारसे गंभीर नाहीत असे बीसीसीआयच्या पदाधिका-यांनी सांगितले. 

ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश केल्यास सर्वोत्तम संघ आणि त्यांचे खेळाडू सहभागी होतील याची हमी द्या तरच, क्रिकेटबद्दल विचार करु असे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने आयसीसीला स्पष्ट केले आहे. भारताच्या स्वीकृतीशिवाय आयसीसी पुढे जायला तयार नाही. भारतामध्ये क्रिकेटची मोठी बाजारपेठ आहे. यापूर्वी 1900 साली पॅरिसमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. 

आयसीसी ब-याच काळापासून क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यासाठी प्रयत्न करत आहे. आयसीसीकडून त्यासाठी सध्या भारताला राजी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आयसीसीच्या हाती सप्टेंबरपर्यंतचा वेळ आहे पण कायद्याच्या कचाटयात अडकलेल्या बीसीसीआयकडून या मुद्यावर फारशी काही हालचाल झालेली नाही. बीसीसीआयचा कारभार चालवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीने क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्याच्या मुद्यावर बीसीसीआय सीईओ राहुल जोहरी यांच्याकडून अहवाल मागितला आहे. क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश झाला तर, बीसीसीआयचे स्वातंत्र्य धोक्यात येईल आणि भारतीय ऑलिम्पिक असोशिएशनच्या देखरेखीखाली काम करावे लागेल त्यामुळे बीसीसीआय सदस्यांचा ऑलिम्पिक समावेशाला विरोध आहे.