पहिल्याच आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात ७ विकेट्स घेऊन इंग्लंडचा गोलंदाज ऑली रॉबिन्सन ( Ollie Robinson) यानं जागतिक क्रिकेटला त्याची दखल घेण्यास भाग पाडले. पण, तो चर्चेत आला ते वेगळ्याच कारणामुळे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यानंतर रॉबिन्सन याचे जुने ट्विट व्हायरल झाले आणि त्यात त्यानं वर्णद्वेषी टिप्पणी केल्याचे समोर आले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं त्याची गंभीर दखल घेत रॉबिन्सनला तपास पूर्ण होईपर्यंत तातडीनं निलंबित केले. आता तपास पूर्ण झाला असून रॉबिन्सनला खेळण्याची परवानगी मिळाली आहे.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या शिस्तपालन समितीनं रॉबिन्सनवर ८ सामन्यांची बंदी घातली होती. त्यापैकी पाच सामने स्थगित झाले आणि उर्वरित तीन सामन्यांची बंदी पूर्ण झाली आहे. त्यामुळे तो लगेचच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकतो. त्याला २.८३ लाखांचा दंडही भरावा लागला आहे. २७ वर्षीय गोलंदाजानं मागील महिन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत सात विकेट्स घेतल्या आणि ४२ धावाही केल्या. आजच्या निर्णयानंतर रॉबिन्सन ४ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळू शकतो. असे झाल्यास टीम इंडियाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
''शिस्तपालन समितीनं दिलेला निर्णय आम्हाला मान्य आहे. आम्ही कोणत्याही प्रकारचं गैरकृत्य खपवून घेणार नाही. क्रिकेटमध्ये असे प्रकार या पुढे घडू नयेत, यासाठी आम्ही काम करत राहू,''असे ECBचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम हॅरीसन यांनी सांगितले.
रॉबिन्सन यानं २०१२ व २०१४ साली हे वादग्रस्त ट्विट केले होते तेव्हा तो १८ व २० वर्षांचा होता. २ जून २०२१मध्ये ते ट्विट पुन्हा चर्चेत आली होती.
काय होते ऑली रॉबिन्सनचे ट्विट१ ‘माझे नवे मुस्लिम मित्र बॉम्ब आहेत. (विशिष्ट धर्माच्या लोकांना दहशतवादी संबोधण्याचा प्रकार.)२ ‘आशियाई लोक अशाप्रकारे हास्य करतात, याचे मला आश्चर्य वाटते!’ (विशेषत: चीनमधील लोकांच्या चहेऱ्यांबाबत भाष्य करीत मी स्वत: वर्णद्वेषी आहे, हे दाखवून दिले.)३ रेल्वेत माझ्यासोबत जी व्यक्ती बसली आहे, त्याला निश्चितपणे इबोला झाला असावा’! (समाजात द्वेष पसरविणे आणि निकृष्ट ठरवून डिवचण्याचा प्रकार.)