NAM vs OMA Live : ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मधील तिसरा आणि ब गटातील पहिला सामना ओमान आणि नामिबिया यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात धावा कमी होत्या पण लढत प्रेक्षणीय झाली. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्याचा निकाल समोर येण्यासाठी सुपर ओव्हर खेळवावी लागली. प्रथम नामिबियाने कमाल करून ओमानला अवघ्या १०९ धावांत रोखले. मग या धावांचा बचाव करताना ओमानच्या गोलंदाजांनी आपली छाप सोडली. अखेर सामना अनिर्णित राहिला आणि सुपर ओव्हरमध्ये नामिबियाने ११ धावांनी विजय साकारला.
सुपर ओव्हरमध्ये निकालसुपर ओव्हरमध्ये नामिबियाने प्रथम फलंदाजी केली. ओमानकडून बिलाल खान षटक घेऊन आला पण नामिबियाने चांगली कामगिरी केली. या महत्त्वाच्या षटकात डेव्हिड व्हिसेने ४ चेंडूत १ षटकार १ चौकार मारून १३ धावा केल्या, तर कर्णधार गेरहार्ड इरास्मसने २ चौकारांच्या मदतीने ८ धावा कुटल्या. नामिबियाने सुपर ओव्हरमध्ये २१ धावा करण्यात यश मिळवले. त्यामुळे ओमानला विजयासाठी ६ चेंडूत २२ धावांची गरज होती. नामिबियाने दिलेल्या २२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ओमानने पहिल्या चेंडूवर २ धावा काढल्या. नामिबियाकडून षटक देखील व्हिसे टाकत होता. डेव्हिड व्हिसेने दुसरा चेंडू निर्धाव टाकून ओमानवर दबाव टाकला. तिसऱ्या चेंडूवर नामिबियाला एक बळी मिळाल्याने ओमानला विजयासाठी ३ चेंडूत २० धावांची आवश्यकता होती. चौथ्या चेंडूवर ओमानच्या शिलेदाराने एक धाव काढली. शेवटच्या दोन चेंडूवर १९ धावा हव्या असताना ओमानने एक धाव काढली. आता केवळ औपचारिकता राहिली होती कारण ओमानला विजयासाठी एका चेंडूत २० धावांची गरज होती. अखेरच्या चेंडूवर ओमानच्या फलंदाजाने षटकार मारला खरा पण नामिबियाने अखेर सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. सुपर ओव्हरमध्ये अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या व्हिसेला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
तत्पुर्वी, नाणेफेक जिंकून नामिबियाने ओमानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सुरुवातीपासूनच संघर्ष करत असलेल्या ओमानच्या संघाला निर्धारित २० षटके देखील खेळता आली नाहीत आणि संघ १९.४ षटकांत अवघ्या १०९ धावांवर गारद झाला. जीशान मकसूद (२२) आणि खालिल कैल (३४) वगळता एकाही ओमानच्या फलंदाजाला २० हून अधिक धावा करता आल्या नाहीत. नामिबियाकडून रूबेन ट्रम्बेलमॅनने सर्वाधिक चार बळी घेऊन कमाल केली. लक्ष्य छोटे होते पण ओमानच्या संघाने दिलेली कडवी झुंज पाहण्याजोगी होती.
ओमानने दिलेल्या ११० धावांच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना नामिबियाला देखील सुरुवातीला एक मोठा झटका बसला. सलामीवीर मायकल वॅन लिंगेन खाते न उघडता तंबूत परतला. मग निकोलस डेव्हिनने (२४) धावा करून मोर्चा सांभाळला, तो बाद होताच डान फ्रायलिंकने (४५) सावध खेळी करताना नामिबियाला विजयाच्या दिशेने नेले. पण, अखेरच्या षटकांत ५ धावांची गरज असताना नामिबियाला अपयश आले अन् सामना अनिर्णित राहिला. नामिबियाचा संघ निर्धारित २० षटकांत ६ बाद १०९ धावा करू शकला.
... अन् सामना अनिर्णित
अखेरच्या षटकातील ४ चेंडूत नामिबियाला विजयासाठी ५ धावांची आवश्यकता होती. मग या षटकातील तिसरा चेंडू निर्धाव (जेन ग्रीन बाद) गेल्यानंतर ३ चेंडूत ५ धावा हव्या होत्या. चौथ्या चेंडूवर एक धाव मिळाल्याने डेव्हिड व्हिसाला स्ट्राईक मिळाले. आता २ चेंडूत ४ धावांची गरज होती. पाचव्या चेंडूवर २ धावा काढण्यात नामिबियाला यश आले. दुसऱ्या टोकाला असलेल्या स्टम्पमुळे ओमानच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला. कारण चेंडू स्टम्पला लागल्याने चौकार गेला नाही. अखेरच्या चेंडूवर २ धावांची गरज असताना चेंडू निर्धाव गेला आणि यष्टीरक्षकाच्या चुकीमुळे नामिबियाने एक धाव काढून सामना बरोबरीत संपवला.
ओमानचा संघ - आकिब इलियास (कर्णधार), कश्यप प्रजापती, नसीम खुशी, जीशान मकसूद, खालिद कैल, अयान खान, मोहम्मद नदीम, मेहरान खान, शकील अहमद, कलीमुल्लाह, बिलाल खान.
नामिबियाचा संघ -गेरहार्ड इरास्मस (कर्णधार), मायकल वॅन लिंगेन, निकोलस डेव्हिन, डान फ्रायलिंक, मालन क्रूगर, जेजे स्मिट, डेव्हिड व्हिसे, जेन ग्रीन, रूबेन ट्रम्बेलमॅन, बर्नार्ड स्कोल्टज आणि टँगेनी लुंगामेनी.