पापुआ न्यू गिनी, नामिबिया, नेदरलँड्स, आयर्लंड, स्कॉटलंड यांच्यानंतर आता ओमान संघाने पात्रता फेरीचा अडथळा पार करताना ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला. ICC Men's T20 World Cup Qualifier स्पर्धेच्या प्ले ऑफ लढतीत ओमानने नाट्यमयरित्या हाँगकाँगचा पराभव केला. ओमानचे 7 बाद 134 धावांचे आव्हान पार करण्यात हाँगकाँगला अपयश आलं. ओमानने हा सामना 12 धावांनी जिंकला.
ओमान आणि हाँगकाँग यांच्यातील सामना नाट्यमय ठरला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या ओमानचे सहा फलंदाज अवघ्या 9 षटकांत 42 धावांत तंबूत परतले होते. पण, सलामीवीर जतिंदर सिंगने एक बाजू लावून धरताना संघाला 7 बाद 134 धावांपर्यंत मजल मारून दिली. जतिंदरने 50 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकार खेचून नाबाद 67 धावा केल्या. त्याला नसीम खुसीनं 9 चेंडूंत 2 चौकार व 2 षटकार खेचून नाबाद 26 धावा करत चांगली साथ दिली. या जोडीनं अखेरच्या काही षटकांत फटकेबाजी करताना ओमानला समाधानकारक पल्ला गाठून दिला.
धावांचा पाठलाग करताना हाँगकाँगलाही सुरुवातीला मोठे धक्के बसले. त्यांचे पाच फलंदाज तर 18 धावांत माघारी पाठवले होते. स्कॉट मॅकेच्नी आणि हरून अर्शद यांनी ही पडझड थांबवली. या दोघांनी 52 धावांची भागीदारी केली. पण, अर्शद 20 धावा करून माघारी परतला. बिलाल खान ( 4/23) यानं सलग हाँगकाँगच्या चार फलंदाजांना माघारी पाठवले. त्याला खावर अली, फय्याज बट यांची उत्तम साथ लाभली. स्कॉट एका बाजूनं खिंड लढवत होता. पण, संघाला विजयासाठी 33 धावांची गरज असताना तो बाद झाला. मोहम्मद नदीमनं त्याला पायचीत केले. स्कॉटनं 46 चेंडूंत 5 चौकारांसह 44 धावा केल्या. त्यानंतर हाँगकाँगचा पराभव निश्चित झाला.