आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( आयसीसी) क्रिकेटमधील भ्रष्टाचाराचे प्रकरणं रोखण्यासाठी कठोर पाऊलं उचलत आहेत. मागील काही वर्षांत आयसीसीनं कारवाईचा बडगा उचलताना अनेक क्रिकेटपटूंवर बंदीची कारवाई केली आहे. त्यात आणखी एका क्रिकेटपटूची भर पडली असून भ्रष्टाचारात अडकलेल्या या खेळाडूवर आयसीसीनं सात वर्षे क्रिकेट खेळण्यावर बंदी घातली आहे. यूसूफ अब्दुलरहीम अल बलूशी असे या खेळाडूचे नाव असून तो ओमान संघाचे प्रतिनिधित्व करतो. पण, आता त्याला आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी नियमानुसार सात वर्ष क्रिकेट खेळता येणार नाही.
आयसीसी पुरुष ट्वेंटी-20 वर्ल्ड कप पात्रता 2019 स्पर्धेत बलूशीनं भ्रष्टाचार केल्याचं सिद्ध झालं आहे. ''हा खूप गंभीर गुन्हा आहे. एखादा खेळाडू महत्त्वाच्या सामन्यात भ्रष्टाचार करतो आणि त्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई व्हायलाच हवी,''असे आयसीसीचे सरचिटणीस अॅलेक्स मार्शल यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की,''बलूशीनं या गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यामुळे त्याच्यावर सात वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.''
सामना फिक्स करणे किंवा त्यासाठी सहकार्य करणे ( कलम 2.1.1), फिक्सिंगला उत्तेजन देणे ( कलम 2.1.4 ) आणि कलम 2.4.4 आदींच्या अंतर्गत बलूशी दोषी आढळला आहे. 2016च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपनंतर बलूशी हा ओमानकडून सातत्यानं खेळलेला नव्हता. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेच्या ब गटात ओमानला दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले होते.