भारत पाकिस्तान हे असे संघ आहेत ज्यांच्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून मालिका झालेल्या नाहीत. हे दोन्ही संघ फक्त आयसीसी आणि आशिया कपमध्येच एकमेकांसमोर येतात. यामुळे या संघांतील सामन्यांना कमालीचा भाव आला आहे. या योग येत्या वर्ल्डकपला जुळून आला आहे. हा सामना पाहण्यासाठी क्रिकेट चाहते वाट्टेल ती किंमत मोजायला तयार आहेत. तुम्हाला धक्का बसेल परंतु या सामन्याच्या तिकीटांचा दर दीड कोटी रुपयांचा आकडा पार करून १.८ कोटी रुपयांवर रेंगाळत आहे.
ही तिकीटे ब्लॅकमध्ये म्हणजेच रिसेलमध्ये उपलब्ध आहेत. आयसीसी वर्ल्डकपच्या सामन्यांची ही तिकिटे खरेदी करण्यासाठी मोठी झुंबड उडाली होती. आता या मारामारीतही ज्यांना तिकिटे मिळालीत त्यांनी ती चक्क विकायला काढली आहेत.
आयसीसीने विकलेल्या प्रिमिअम तिकिटाची किंमत सुमारे ३३ हजार रुपये एवढीच आहे. परंतु काळ्या बाजारात हे तिकीट १.८ कोटी रुपयांना विकण्यात येत आहे. स्टबहब आणि सीटगीक सारख्या प्लॅटफॉर्मवर ही तिकीटे विकली जात आहेत. रिसेलमध्ये या तिकिटांची किंमत ४०००० डॉलर्सपासून सुरु होत आहे. म्हणजेच ३३ लाख रुपये. फी जोडली तर ही किंमत ४१ लाख रुपयांपर्यंत जात आहे.
युएसए टुडेच्या वृत्तानुसार रिसेल मार्केटमझ्ये सुपर बाऊल ५८ च्या तिकीटाची किंमत अधिकाधिक ९००० डॉलर आहे. तर एनबीए फायनलच्या कोर्टसाईडच्या सीटची किंमत 24,000 डॉलर आहे. सीटगीकवर या तिकिटांना अलिशान कारचा भाव आला आहे. टी २० विश्वकपच्या भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकीटाचा दर १.४ कोटी रुपये आहे. यात फी जोडली तर हा दर १.८६ कोटी रुपयांवर जात आहे.
T20 विश्वचषक 2024 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या या स्पर्धेत भारतीय संघाला पाकिस्तानसोबत अ गटात ठेवण्यात आले आहे. या गटात हे दोनच मोठे संघ आहेत. आयर्लंड, कॅनडा आणि अमेरिका असे तीन संघ दुबळे आहेत.