कोलकाता : भारतात टेस्ट मॅचला मिळणारा प्रतिसाद पाहता या सामन्याची तिकिटे कधी ब्लॅकने विकली जात असतील यावर विश्वास बसणार नाही. तीही बांगलादेश सोबतची मॅचसाठी. पण हे खरे आहे. कोलकातामध्ये पहिली डे-नाईट टेस्ट मॅच उद्या होणार आहे. काहीसा वेगळा प्रयोग असल्याने या मॅचचा आनंद लुटण्यासाठी क्रिकेटप्रेमींची झुंबड उडाली आहे.
भारत आणि बांगलादेश दरम्यान उद्यापासून कोलकाताच्या ईडन गार्डनवर पहिली डे-नाईट टेस्ट मॅच खेळविली जाणार आहे. क्रिकेटप्रेमींकडून मागणी वाढल्याने तिकिटांचा काळाबाजार होऊ लागला आहे. बुधवारी अँटी राऊडी स्कॉडने कारवाई करत सहा जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 38 तिकिट जप्त करण्यात आली आहेत.
या मॅचचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मॅचमध्ये कोकोबुराचा लाल चेंडू नाही तर एसजीचा गुलाबी चकाकणारा चेंडू वापरण्यात येणार आहे. ही मॅच यशस्वी व्हावी य़ाची जबाबदारी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी घेतली आहे. त्यांनी सांगितले की, पिच चांगले आहे. तुम्ही शेवटची टेस्ट मॅच कोणती पाहिली असेल ज्या मॅचचे पहिल्या 4 दिवसांचे तिकिट विकले गेले असतील.
ही मॅच पाहण्यासाठी सचिन तेंडूलकर, सुनिल गावस्कर, कपिल देव, राहुल द्रविड, अनिल कुंबळे असे दिग्गज माजी क्रिकेटपटू असणार आहेत. माजी कर्णधार चहापानावेळी एका कार्टमध्ये बसून मैदानाची चक्कर मारणार आहेत.
दिवस-रात्र कसोटी क्रिकेटचे वय तसे काही फार जास्त नाही. साधारणत: ४ वर्षांपूर्वी, नोव्हेंबर २०१५ पासून हा सिलसिला सुरू झाला. अॅडलेड येथे यजमान ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे शेजारी जागतिक क्रिकेटमधील पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळले. अवघ्या तीन दिवसांत निकाल लागलेली ही लढत कांगारूंनी ३ गडी राखून जिंकली. सुमारे सव्वा लाख प्रेक्षक अॅडलेड ओव्हलच्या म़ैदानावर रंगलेल्या या ऐतिहासिक कसोटीचे साक्षीदार झाले होते. टीम इंडिया खेळत असलेली ही दिवस कसोटी लढत आंतरराष्ट्रीय स्तरावरील १२वा सामना असेल.