- अभिजित देशमुख, लंडन : आयसीसी कसोटी क्रमवारीत नंबर वन फिरकीपटू आणि दुसऱ्या स्थानावरील अष्टपैलू खेळाडू असलेल्या रविचंद्रन अश्विनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध बुधवारी ओव्हलवर सुरू झालेल्या डब्ल्यूटीसी फायनलसाठी अंतिम एकादशमधून वगळणे ही भारतीय संघाची मोठी चूक असल्याचे मत न्यूझीलंडचा माजी कर्णधार रॉस टेलर याने व्यक्त केले.
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम एकादशमध्ये अश्विनला वगळून अष्टपैलू शार्दुल ठाकूरला संधी दिली. रवींद्र जडेजा या एकमेव फिरकी गोलंदाजाचा समावेश करण्यात आला.
ओव्हलवरील ढगाळ वातावरणात रोहितने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. ही खेळपट्टी तिसऱ्या दिवसानंतर शुष्क झाल्यास फिरकीला अनुकूल ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याविषयी टेलर म्हणाला, ‘ऑस्ट्रेलियाने चार डावखुऱ्या फलंदाजांना संघात स्थान दिले आहे. अश्विन हा डावखुऱ्या फलंदाजांना प्रभावी मारा करू शकतो. त्याचवेळी खेळपट्टीवरील हिरवळ लक्षात घेत रोहितने चार वेगवान गोलंदाजांना संघात स्थान दिले असावे. त्याच्या निर्णयाचा सन्मान केला पाहिजे.’
अश्विनने इंग्लंडमध्ये कसोटीत २८.११ च्या सरासरीने १८ गडी बाद केले आहेत. तो फलंदाजीतही उपयुक्त ठरत असून, त्याने येथे १४ डावांत २६१ धावा केल्या आहेत. त्यामुळे अश्विनला वगळणे अनेकांना रूचलेले नाही.