नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या संघाचा माजी दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नचा (Shane Warne) आज म्हणजेच 13 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. 13 सप्टेंबर 1969 रोजी ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गजांचा जन्म झाला होता. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक बळी पटकावण्याच्या यादीत वॉर्नचा नंबर दुसऱ्या क्रमांकावर लागतो. वॉर्नने आपल्या जादूई फिरकीच्या तालावर जगभरातील अनेक दिग्गज फलंदाज नाचवले होते. ऑस्ट्रेलियाच्या या महान खेळाडूचा मृत्यू 4 मार्च 2022 रोजी झाला. अवघ्या 52 व्या वर्षी वॉर्नने जगाला निरोप दिल्याची बातमी पसरताच क्रिकेट वर्तुळाला मोठा धक्का बसला होता. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त जगभरातील अनेक खेळाडू त्याच्या आठवणींना उजाळा देत आहेत.
वॉर्नच्या आठवणीने सचिन तेंडुलकर भावूक
दरम्यान, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) एक भावनिक पोस्ट करून त्याच्या मित्राच्या आठवणींना उजाळा दिला आहे. "वॉर्नी, तुझ्या वाढदिवशी मी तुझा विचार करत आहे! तू खूप लवकर सोडून गेला. तुझ्यासोबत खूप अविस्मरणीय क्षण घालवले आहेत. त्यांना कायमचे जपले जाईल मित्रा", अशी भावनिक पोस्ट करून सचिनने वॉर्नच्या जन्मदिवशी त्याला अभिवादन केले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी पटकावणाऱ्यांच्या यादीत वॉर्न दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत श्रीलंकेचा मुथैया मुरलीधरण 800 बळींसह पहिल्या स्थानावर विराजमान आहे, तर 708 बळी घेणारा ऑस्ट्रेलियन दिग्गज दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच इंग्लंडच्या जेम्स ॲंडरसनने 174 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 658 बळी घेऊन तिसरे स्थान पटकावले आहे.
शेन वॉर्नची कारकीर्द
शेन वॉर्नने ऑस्ट्रेलियाकडून 1992 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने कारकिर्दीतील पहिला कसोटी सामना भारताविरुद्ध खेळला. त्याने संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीत एकूण 145 कसोटी सामने खेळले. कारकिर्दीतला शेवटचा कसोटी सामना शेन वॉर्न 2007 मध्ये इंग्लंड विरुद्ध खेळला. शेन वॉर्न न्यूझीलंडविरुद्ध 1993 मध्ये पहिल्यांदा एकदिवसीय क्रिकेट खेळला. तर त्याने शेवटचा एकदिवसीय सामना न्यूझीलंडविरूद्ध खेळला होता. 194 एकदिवसीय सामने खेळणारा वॉर्न अनेकवेळा वादांमुळे चर्चेत राहिला होता.
Web Title: On Shane Warne's birthday, Sachin Tendulkar has rekindled old memories with an emotional post.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.