विशाखापट्टणम : एकदिवसीय विश्वचषक अंतिम सामन्यात झालेला पराभव विसरून सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात युवा भारतीय संघ गुरुवारपासून सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेत बलाढ्य ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाला सामोरा जाईल. विश्वचषकातील दारुण पराभव मागे टाकणे इतके सोपे काम नाही. सूर्याला अवघ्या ९६ तासांत संघाचे नेतृत्व करायचे आहे. त्याला आत्मपरीक्षणाचीही संधी मिळालेली नाही; पण टी-२० त्याचा आवडता प्रकार. त्यासाठी तो सज्ज असेल.
संघाचा कर्णधार या नात्याने सूर्याची जबाबदारी केवळ विजय मिळविण्याचीच नव्हे, तर पुढच्या वर्षी वेस्ट इंडीज- अमेरिका येथे होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वचषकासाठी दावेदारी सादर करणारे खेळाडू तयार करणे हीदेखील असेल. यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा आणि मुकेश कुमार यांनी अलीकडे आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे. या सर्वांची पहिली परीक्षा ऑस्ट्रेलियाविरुद्ध असेल.
प्रतिस्पर्धी संघात विश्वचषक जिंकणारे ट्रॅव्हिस हेड, ग्लेन मॅक्सवेल, लेग स्पिनर ॲडम झम्पा आणि माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ यांचा समावेश आहे.
शिवाय आयपीएल गाजविणारे मार्क्स स्टोइनिस, नॅथन एलिस, टीम डेव्हिड हेही संघात आहेत. प्रमुख वेगवान गोलंदाजांच्या अनुपस्थितीतही मॅथ्यू वेडच्या नेतृत्वाखालील हा संघ तगडा आहे. रोहित, विराट आणि राहुल यांना विश्रांती देण्यात आल्यामुळे निवडकर्ते पुढच्या वर्षीच्या टी-२० विश्वचषक संघाची बांधणी करू शकतील. सलामी जोडीची जबाबदारी ऋतुराजसोबत जैस्वाल किंवा किशन यापैकी एकाकडे सोपविली जाईल. सध्याच्या भारतीय संघात डावखुरे खेळाडू अधिक आहेत. रिंकूने आतापर्यंत जे सामने खेळले त्यात तो लक्षवेधी ठरला. हीच बाब तिलक आणि मुकेश यांना लागू पडते. दुसरीकडे जितेशला मात्र ईशान किशनमुळे प्रतीक्षा करावी लागेल.
युवा खेळाडूंसाठी मोठी संधी
भारताला आयपीएलआधी ११ टी-२० सामने खेळायचे आहेत. दोन महिने चालणाऱ्या आयपीएलनंतर टी-२० विश्वचषकाचे आयोजन होईल. अशावेळी युवा खेळाडूंसाठी पुढील काही महिने महत्त्वपूर्ण असतील. हंगामी प्रशिक्षक म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मण संघासोबत आहेत. भारताच्या गोलंदाजांचीही परीक्षा असेल. रवी बिश्नोईसह प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार आणि अर्शदीप सिंग यांना आळीपाळीने संंधी दिली जाईल. अक्षर पटेल याला मात्र मालिकेत पाचही सामन्यांत खेळविले जाऊ शकते.
भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), ईशान किशन, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार.
ऑस्ट्रेलिया : मॅथ्यू वेड (कर्णधार), ॲरोन हार्डी, जेसन बेहरेनडोर्फ, सीन एबोट, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर सांघा, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टोइनिस, केन रिचर्डसन आणि ॲडम झम्पा.
Web Title: Once again Australia; Indian team will play T20 series from today
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.