लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : २ एप्रिल २०११ रोजी प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या वानखेडे स्टेडियमवर महेंद्रसिंग धोनीने षट्कार मारला अन् भारताचा २८ वर्षांचा दुष्काळ संपला. भारताने १९८३ नंतर पहिल्यांदाच वन-डे विश्वचषक उंचावला. या घटनेला आता एक तप उलटून गेले आहे. मात्र, या क्षणाची पुनरावृत्ती झालेली नाही. अशीच अंतिम लढत यंदा पुन्हा रंगेल, असे भाकीत श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू निरोशन डिकवेला याने वर्तविले आहे.
२०११च्या विश्वचषकात भारत-श्रीलंका हे आशिया खंडातील देश अंतिम फेरीत पोहोचले होते. यंदाचा विश्वचषकही भारतात होत आहे. त्यामुळे यंदाही आशियातील दोन संघ अंतिम फेरीत खेळणार का, अशी चर्चा सुरू झाली. डिकवेला यांच्या मते, ‘यंदाच्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकाची अंतिम लढतही भारत आणि श्रीलंका यांच्यातच होईल.’ विश्वचषकात भारत-श्रीलंका सामना वानखेडे स्टेडियमवर २ नोव्हेंबरला होणार आहे.
एका मुलाखतीत डिकवेला म्हणाला, ‘यंदाच्या विश्वचषकातही भारत-श्रीलंका यांच्यात फायनल होईल, अशी आशा करतोय. जो कोणी प्रक्रिया, मूलभूत गोष्टी योग्य प्रकारे अंमलात आणेल, चांगले क्रिकेट खेळेल तो जिंकेल. आम्ही आमच्या संघावर जास्त लक्ष देणार आहोत, विरोधी संघांवर नाही.’
अंडरडॉग्स असणे कधीही चांगले...
विश्वचषकापूर्वी आशियातील सर्व संघ आशिया कपमध्ये एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. ही एकप्रकारे विश्वचषकाची रंगीत तालीम असणार आहे. गेल्या आशिया चषकामध्ये श्रीलंकाने जेतेपद पटकाविले होते. गेल्या वर्षाचा आशिया कप हा टी-२० मध्ये खेळविण्यात आला होता. श्रीलंकेने अनपेक्षितपणे अंतिम फेरी गाठत ट्रॉफी जिंकली. दुबईत त्यांनी पाकिस्तानचा २३ धावांनी पराभव केला होता. याबाबत डिकवेला म्हणाला, ‘संभाव्य विजेता होण्यापेक्षा अंडरडॉग्स असणे कधीही चांगले. आम्हाला योग्य प्रक्रिया फॉलो करावी लागेल. याचबरोबर होमवर्क करून रणनीती आखावी लागेल. आम्ही योग्य सराव आणि होमवर्क केले आहे. गेल्या आशिया कपमध्ये श्रीलंकेने या सर्व गोष्टी केल्या होत्या. त्यामुळेच श्रीलंका संघ विजयी ठरला.’