- मतीन खान
स्पोर्ट्स हेड - सहायक उपाध्यक्ष, लोकमत पत्रसमूह
भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाला आता केवळ ५८ दिवस उरले आहेत. अशातच या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या १८ सदस्यीय संघाची घोषणा केली. दुसरीकडे भारत मात्र वेस्ट इंडीजमध्ये टी-२० मालिका खेळण्यात व्यस्त आहे. विशेष म्हणजे या मालिकेतील संघाचा एकंदरीत खेळ बघितला तर असे वाटत नाही की भारतीय संघाने विश्वचषकाच्या तयारीला गंभीरतेने घेतले आहे. कुठलाही क्रिकेट चाहता सध्या एकच प्रश्न विचारतो आहे की या भारतीय संघाचे चालले आहे तरी काय?
विश्वचषकाच्या तयारीचा भाग म्हणून सुरुवातीला वेस्ट इंडीजविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित-विराटला संघात स्थान देण्यात आले. पण या मालिकेतील तीनपैकी एकच सामना हे दोघे खेळले. मग तयारीचे काय झाले?
वनडे विश्वचषकासाठी भारताचे जे संभावित खेळाडू आहेत, त्यापैकी काही आयर्लंड दौऱ्यावर जाणार तर काहींची एशियाडसाठी निवड केली आहे. बाकीचे मग आशिया चषक खेळतील. या सगळ्या सावळा गोंधळात एक गोष्ट कळायला मार्ग नाही की विश्वचषकासाठीच्या भारतीय संघातील अंतिम १५ खेळाडू कोणते? २०१९ ते २०२३ या चार वर्षांत बीसीसीआय अजूनही १५ खेळाडूंचा अंतिम संघच शोधतो आहे?
भारताचा फलंदाजी क्रमही अजून ठरलेला दिसत नाही. सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन की लोकेश राहुल, चौथ्या क्रमांकासाठी कोण याचाही पत्ता नाही. यानंतर मग पाचव्या क्रमांकावर कोण, कोणता अष्टपैलू संघात असेल, फिरकीपटूंचे काय?
या त्याच चुका आहेत ज्या भारताने २०१५ आणि २०१९ च्या वनडे विश्वचषकावेळी केल्या होत्या. २०१९ ला वर्षभर अंबाती रायुडूचे नाव खूप चालले, पण अंतिम संघात स्थान दिले ते विजय शंकरला. पुन्हा एकदा हेच बघायला मिळेल का?
अवघ्या ५८ दिवसांवर विश्वचषक आला तरी अजूनही चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर कोण खेळणार हे संघ व्यवस्थापन ठरवू शकलेले नाही. मग शेवटच्या क्षणी संघात समन्वय कसा साधणार?
वर्षभरापासून दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या बुमराहला थेट कर्णधार बनवून आयर्लंड दौऱ्यासाठीच्या संघात आणले, पण यावरून हे सिद्ध होतं का तो विश्वचषकात खेळेल? दरम्यान, ऋतुराजच्या नेतृत्वाखाली खेळण्यास बुमराहने नकार दिल्यामुळे त्याच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ पडली, अशी कुजबुज आहे.
ही सगळी परिस्थिती बघितली तर पुन्हा प्रश्न पडतो की विश्वचषकाचा संपूर्ण भार केवळ रोहित-विराट यांच्या खांद्यावरच आहे का?
वरील सर्व प्रश्नांची उत्तरे निवड समितीप्रमुख अजित आगरकर आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड देऊ शकतील की रसायनशास्त्र प्रयोगशाळेतील प्रयोगांप्रमाणे भारतीय संघासोबत प्रयोग करुन जिंकण्याचा फॉर्म्युला शोधत राहतील.
पुरानी गलतियों के जब जख्म भरने लगते हैं,
हम अंजाने में फिर उसी राह पर चलने लगते हैं |
Web Title: Once again the first one is fifty five, india vs west indies t 20
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.