नवी दिल्ली, दि. 31 - अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या भारतीय क्रिकेट संघाच्या ताफ्यात एक महत्वाचा खेळाडू आहे. सध्या तो ज्या शिखरावर पोहचला आहे, त्यासाठी त्याने भरपूर मेहनत घेतली आहे. एक काळ असा होता की, क्रिकेटचा सराव करण्यासाठी लागणारे सामान सुद्धा त्याला दुस-या खेळांडूकडून उधारीने घ्यावे लागत होते. याशिवाय सरावादरम्यान, दिवसातून दोन वेळा फक्त मॅगी खाऊन तो आपल्या पोटाची भूक भागवत होता.
भारतीय संघात स्थान मिळवण्याच्या उद्देशाने मी भरपूर मेहनत करत होतो. अंडर -19 क्रिकेट खेळताना फक्त मॅगी खाऊन दिवस काढत होतो, असा खुलासा हार्दिक पांड्याने केला आहे. मला मॅगी खूप आवडायची आणि माझी आर्थिक परिस्थिती त्यावेळी खराब होती. त्यामुळे मैदानात फिट राहण्यासाठी मला मॅगीवर दिवस काढावे लागत होते. क्रिकेट खेळण्याआधी म्हणजे सकाळी मी मॅगी खात होतो. त्यानंतर संध्याकाळी क्रिकेट खेळून आल्यावर पुन्हा मॅगीवर भूक भागवत होतो. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे मला हवे ते मी खाऊ शकतो, असे हार्दिक पांड्या याने एका टिव्ही शोदरम्यान सांगितले. यापुढे तो म्हणला की, मी आणि माझा भाऊ कुणाल क्रिकेट खेळण्यासाठी वेगवेगळ्या गावी जात होते. त्यावेळी प्रत्येक सामन्यासाठी आम्हाला पैसे मिळत होते. प्रत्येक सामन्यासाठी कुणालला 500 रुपये, तर मला 400 रुपये मिळायचे. ही परिस्थिती आयपीएलमध्ये निवड होण्याआधी सहा महिन्यांपर्यंत चालू होती. मात्र आयपीएलनंतर बदलली. त्यामुळे आज आम्ही हवे ते खाऊ शकतो आणि हवे तसे जगू शकत असल्याचेही यावेळी हार्दिक पांड्या म्हणाला.
गेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हार्दिक पांड्या चांगल्या फॉर्ममध्ये होता. ज्यावेळी भारताच्या दिग्गज खेळाडूंनी पाकिस्तानी गोलंदाजांसमोर अंतिम फेरीत गुडघे टेकले, त्यावेळी हार्दिक पांड्याने उत्तम कामगिरी करत पाकिस्तानी आक्रमणाचा सामना केला होता. त्यानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यातही हार्दिक पांड्याने फलंदाजी आणि गोलंदाजीत आपली कमाल दाखवली होती. याच कामगिरीच्या आधारावर हार्दिक पांड्याची अष्टपैलू खेळाडू म्हणून श्रीलंका दौऱ्यासाठी निवड झाली आहे.