नवी दिल्ली : ब्रेट लीच्या वेगवान माऱ्याला सामोरे जाण्याच्या विचारानेच एकवेळ रोहित शर्माची झोप उडाली होती. पण सध्याच्या गोलंदाजांमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये जोश हेजलवूडच्या माºयाला सामोरे जाण्यास हा भारतीय सलामीवीर उत्सुक नसतो.रोहितला विचारण्यात आले की आतापर्यंत कुठल्या वेगवान गोलंदाजाला सामोरे जाताना अडचण आली. त्याबाबत बोलताना तो म्हणाला,‘तो गोलंदाज आहे ब्रेट ली. कारण २००७ मध्ये आॅस्ट्रेलियाच्या माझ्या पहिल्या दौºयात लीमुळे माझी झोप उडाली होती. कारण १५० किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने मारा करणाºया या गोलंदाजाला कसे सामोरे जायचे, याचाच मी विचार करीत होतो.’ स्टार स्पोर्ट््सच्या ‘क्रिकेट कनेक्टेड’ कार्यक्रमात बोलताना रोहित म्हणाला, ‘ब्रेट ली २००७ मध्ये कारकिर्दीच्या शिखरावर होता.तो सातत्याने १५०-१५५ किमीच्या वेगाने गोलंदाजी करीत होता. या वेगवान माºयाला सामोरे जाण्याच्या विचारानेच माझ्यासारख्या युवा खेळाडूची झोप उडाली होती.’
रोहित पुढे म्हणाला, ‘सध्याच्या क्रिकेटमध्ये ज्या गोलंदाजाला कसोटी क्रिकेटमध्ये मी खेळण्यास इच्छुक नसतो तो आहे जोश हेजलवूड. कारण तो शिस्तबद्ध मारा करतो आणि दिशा व टप्पा अचूक राखतो. तो फटकेबाजी करण्याची संधी देत नाही.’ तो पुढे म्हणाला, ‘जर यावेळी आॅस्ट्रेलियामध्ये कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली तर मला जोशविरुद्ध खेळण्यासाठी शिस्तबद्ध फलंदाजी करण्याची मानसिक तयारी करावी लागेल.’
रोहित पुढे म्हणाला की, दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेननेही त्याच्याविरुद्ध वर्चस्व गाजवले. कारण तो वेगवान माºयासह चेंडू स्विंग करण्यास माहीर होता. निवृत्ती स्वीकारणाºया माझ्या दोन आवडत्या गोलंदाजांमध्ये एक ब्रेट ली व दुसरा डेल स्टेन यांचा समावेश आहे.’