अबुधाबी : एकही धाव न करता चार फलंदाज गमावण्याची नामुष्की पाकिस्तानच्या संघावर ओढवली आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या दुसऱ्या कसोची सामन्याच्या पहिल्याच दिवशी आपले चार फलंदाज एकही धाव न करता बाद होण्याची आफत पाकिस्तानवर आली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानचा संघ 282 धावांत सर्वबाद झाला. पाकिस्तानला पहिला धक्का पाच धावांवर बसला होता. त्यानंतर मात्र दुसऱ्या विकेटसाठी पाकिस्तानने 52 धावा केल्या. पाकिस्तानला दुसरा धक्का 57 धावांवर बसला. पण पाकिस्तानने आपले चार फलंदाज याच धावसंख्येवर गमावल्याचे पुढे आले आहे.
ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लियॉनने या चारही फलंदाजांना बाद करण्याची किमया साधली. नॅथनने पहिल्यांदा अझर आलीला 15 धावांवर बाद केले. त्यानंतर हारिस सोहेल, असद शफिक आणि बाबर आझम यांना भोपळाही फोडू न देता तंबूत धाडले. त्यामुळे पाकिस्तानची 2 बाद 57 वरून 5 बाद 57 अशी दयनीय अवस्था झाली होती. पण त्यानंतर कर्णधार सर्फराझ अहमदने 94 धावांची खेळी साकारली आणि पाकिस्तानला 282 धावा करता आल्या.