नवी दिल्ली: भारतीय संघाला वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वीच्या शेवटच्या वन डे मालिकेत पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाने ०-२ अशी पिछाडीवरून कमबॅक करताना मालिका ३-२ अशी जिंकली. या मालिकेतील कामगिरी प्रत्येक खेळाडूसाठी वर्ल्ड कप संघात स्थान मिळवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची होती. या मालिकेतील कामगिरीनंतर वर्ल्ड कप संघात एक बदल पाहायला मिळेल असे सूचक विधान कर्णधार विराट कोहलीनं केलं. त्यामुळे हा एक खेळाडू कोण असेल याची चर्चा सुरू झाली आहे.
या मालिकेत रिषभ पंत आणि लोकेश राहुल यांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. महेंद्रसिंग धोनीला राखीव यष्टिरक्षक म्हणून पंतचे नाव आघाडीवर आहे. पण, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील अखेरच्या दोन सामन्यात धोनीच्या अनुपस्थितीत पंतला संधीचं सोनं करता आले नाही. राहुलची बॅटही फार तळपली नाही. त्यामुळे कोहलीच्या विधानाचा रोख या दोघापैकी एकाकडे जातो, असे जाणकारांचे म्हणने आहे.
कोहली म्हणाला,"वर्ल्ड कप स्पर्धेत कोणते अकरा खेळाडू घेऊन मैदानावर उतरायचे हे निश्चित आहे. इंग्लंडमधील परिस्थिती पाहता संघात एक बदल होऊ शकतो. आम्ही सर्वोत्तम अकरा घेऊन खेळलो आणि पराभूत झालो, तरी तुम्ही टीका करणार. पण, संघात सकारात्मक वातावरण आहे."
अजिंक्य रहाणे किंवा दिनेश कार्तिकला संधी? तिसरा सलामीवीर म्हणून अजिंक्य रहाणेच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो. शिवाय पंतच्या जागी दिनेश कार्तिकला स्थान मिळू शकतो. पण, या दोघांनाही मागे टाकून विजय शंकर बाजी मारू शकतो. शंकरने मिळालेल्या संधीचं सोनं केलं आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध त्याने समाधानकारक कामगिरी केली होती. पण, हार्दिक पांड्याच्या पुनरागमनानं त्याचे संघातील स्थान धोक्यात आले आहे.
भारतीय संघ : रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल / अजिंक्य रहाणे, विराट कोहली, अंबाती रायुडू, महेंद्रसिंग धोनी, रिषभ पंत/ दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, विजय शंकर, कुलदीप यादव, केदार जाधव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार.