Join us  

‘वनडे  विश्वचषक क्रिकेट’ने तोडले प्रसारणाचे विक्रम

टीव्हीवर एक लाख कोटींहून अधिक मिनिटे पाहण्यात आली स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 9:59 AM

Open in App

नवी दिल्ली : भारतात नुकतीच झालेली एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आयसीसीच्या इतिहासातील सर्वांत यशस्वी स्पर्धा ठरलेली आहे. या वर्ल्ड कपने आयसीसीच्या सर्व जुन्या स्पर्धांचे प्रसारण आणि डिजिटल विक्रम तोडले आहेत.    

कोणत्याही आयसीसी स्पर्धेत पहिल्यांदा टीव्हीवर (प्रसारण) एक ट्रिलियन लाइव्ह (थेट प्रक्षेपण) मिनिटांचा आकडा पार झाला आहे. म्हणजेच, चाहत्यांनी एकूण एक लाख कोटी मिनिटांहून जास्त काळ लाइव्ह सामने पाहिले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलने (आयसीसी) मंगळवारी आपल्या संकेतस्थळावर आणि एक्सवर (ट्विटर) याबाबत माहिती दिली. भारतात २०११मध्ये झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपेक्षा यंदाची स्पर्धा ३८ टक्के अधिक पाहिली गेली. त्याचवेळी इंग्लंडमध्ये झालेल्या मागील विश्वचषक २०१९ स्पर्धेच्या तुलनेत यंदाच्या स्पर्धेला १७ टक्के अधिक प्रेक्षक मिळाले. 

ओटीटीवरही तुटले विक्रम

स्पर्धेने डिजिटल व्यासपीठावरही विक्रम मोडीत काढले. डिजिटलवर १६.९ अब्ज व्हिडीओ दृश्यांसह ही आतापर्यंतची सर्वाधिक पाहिली गेलेली आयसीसी स्पर्धा ठरली. भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान १९ नोव्हेंबरला झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम लढतीने प्रेक्षकसंख्येचे सर्व विक्रम मोडले गेले. ओटीटी व्यासपीठ डिस्नी प्लस हाॅटस्टारवर एकावेळी विक्रमी ५.९ कोटींहून अधिक चाहते सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहत होते. ओटीटीवर आतापर्यंत कोणत्याही क्रिकेट सामन्याचे एवढ्या लोकांनी थेट प्रक्षेपण पाहिले नव्हते. सामन्यात ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व वाढू लागल्यावर प्रेक्षकांची संख्या घटत गेली. याआधीचा विक्रम याच स्पर्धेत १५ नोव्हेंबरला झालेल्या भारत-न्यूझीलंड उपांत्य सामन्यात नोंदवला गेला होता. हा सामना ५.३ कोटी लोकांनी ओटीटीवर पाहिला होता.

अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम लढतीत १.३ लाख चाहते उपस्थित होते. या लढतीला एकूण ८,७६० कोटी लाइव्ह मिनिटे मिळाली. २०११च्या विश्वचषक अंतिम लढतीच्या तुलनेत हा आकडा ४६ टक्के अधिक होता. यजमान भारताच्या चाहत्यांचे यात सर्वाधिक योगदान होते. डिस्नी स्टार नेटवर्कवर भारतीयांनी ४२,२०० कोटी मिनिटे सामने पाहिले. हा आकडाही २०११च्या तुलनेत ५४ टक्के आणि २०१९च्या तुलनेत ९ टक्के अधिक आहे.

 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कप