Join us  

श्रीलंकेला कसोटीत सहजपणे नमवले म्हणून एकदिवसीय मालिकेत गृहीत धरता येणार नाही

रविवारपासून भारत-श्रीलंकादरम्यान एकदिवसीय मालिकेला सुरुवात होईल. ही मालिका नक्कीच महत्त्वाची आहे. जरी भारताने यजमानांना कसोटी मालिकेत सहजपणे नमवले असले, तरी माझ्या मते जेव्हा कधी क्रिकेटचे स्वरूप लहान बनते तेव्हा संधी दोन्ही संघांना असते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 5:04 AM

Open in App

- अयाझ मेमनरविवारपासून भारत-श्रीलंकादरम्यान एकदिवसीय मालिकेला सुरुवात होईल. ही मालिका नक्कीच महत्त्वाची आहे. जरी भारताने यजमानांना कसोटी मालिकेत सहजपणे नमवले असले, तरी माझ्या मते जेव्हा कधी क्रिकेटचे स्वरूप लहान बनते तेव्हा संधी दोन्ही संघांना असते. उदाहरण द्यायचे म्हणजे, अफगाणिस्तान-आयर्लंडसारखे नवखे संघ टी-२० मध्ये मोठ्या मोठ्या संघाला नमवण्याची क्षमता राखून आहेत. परंतु, एकदिवसीय सामन्यात ते झुंजतील आणि कसोटी सामन्यात तर त्यांना खूपच झुंजावे लागेल. एक उदाहरण वेस्ट इंडिजचेच घ्या, ते टी-२० चॅम्पियन्स आहेत. परंतु, एकदिवसीय सामन्यात त्यांची विशेष कामगिरी नाही. तसेच, कसोटीमध्येही त्यांची कामगिरी खूपच सुमार आहे. त्यामुळेच, जर कोहली कंपनी विचार करीत असेल, की आपण लंकेला कसोटीमध्ये सहज नमवले असल्याने एकदिवसीय मालिकाही सहजपणे जिंकू, तर असे अजिबात नाही. मला वाटते, की श्रीलंकेकडे एकदिवसीय सामन्याची गुणवत्ता चांगली आहे. वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाचे पुनरागमन झाले आहे. उपूल थरंगाने नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारतानाच कसोटी मालिकेतील कामगिरीवरून आम्हाला गृहीत धरू नका, अशी चिथावणीही दिली आहे आणि असे होऊदेखील शकते. कारण, एकदिवसीय क्रिकेटमध्ये संयमावर फारसे लक्ष केंद्रित नसते. पाच दिवस क्रिकेट खेळण्यासाठी मानसिकरीत्या खूप कणखर असावे लागते आणि येथेच विंडीज, झिम्बाब्वे, बांगलादेशसारखे कमजोर संघ अपयशी होतात. श्रीलंकेची स्थितीही सध्या अशीच आहे.भारतीय संघाबाबत सांगायचे झाल्यास, गेल्या एक वर्षापासून संघाचा सदस्य असलेला स्टार अष्टपैलू युवराज सिंग या वेळी संघात नसेल. तसेच सुरेश रैनाही संघात नाही. दोघेही यो-यो टेस्टमध्ये अपयशी ठरल्याची माहिती मिळाली. यावरून तंदुरुस्तीला किती महत्त्व दिले जात आहे ते कळतं आणि हे संघासाठी खूप चांगले आहे. कारण, मी असा काळ बघितलाय जेव्हा खेळाडूंनी दोन लॅप पळून काढले तेव्हा त्यांना तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र मिळायचे. त्यामुळे, तंदुरुस्ती पूर्ण नसेल, तर आज दिग्गज खेळाडूलाही संघाबाहेर बसावे लागते, जी खूप महत्त्वाची बाब आहे.दुसरं म्हणजे रोहित शर्माला उपकर्णधारपदी निवडले आहे. तो दहा वर्षांपासून खेळतोय. आयपीएलमध्ये ३ विजेतेपदे जिंकली आहेत आणि आता कोहलीला सहाय्य करण्याची जबाबदारी त्याच्याकडे देण्यात आली आहे. त्यामुळे आता काहीसा दबाव महेंद्रसिंह धोनीवरही पडू शकतो. कारण, आतापर्यंत तो कोहलीसाठी विशेष सल्लागार होता. पण आता त्यालाही आपल्या कामगिरीवर खूप लक्ष द्यावे लागेल. कारण, निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी, कोणीही खेळाडू संघातील आपले स्थान गृहीत धरू शकणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले आहे.त्याचवेळी मनीष पांड्ये, के. एल. राहुल यांसारख्या खेळाडूंकडे स्वत:ला सिद्ध करण्याची संधी असेल. तसेच गोलंदाजांमध्ये कसोटी मालिकेत न खेळलेले भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह हेदेखील आपली छाप पाडण्यासाठी खूप उत्सुक असतील.

(लेखक हे संपादकीय सल्लागार आहेत)

टॅग्स :क्रिकेट