- सुनील गावसकर
(स्ट्रेट ड्राईव्ह)
सकाळी उठताच खोलीचे पडदे सरकवले तेव्हा सूर्य तेजासह चमकताना दिसला. गडद अंधारानंतरची ही सूर्यकिरणे होती. कडवा प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून नामुश्कीचा पराभव पत्करावा लागला असला, तरी भारतीय संघाला हीच गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. विराट कोहलीच्या विशेष कामगिरीनंतरही मागच्या ३० वर्षांत पाकिस्तानकडून पराभव पत्करणारा पहिला भारतीय कर्णधार हा नकोसा ठपका त्याच्यावर लागला.
विराटने स्पष्ट केले हा रविवारचा दिवस भारताचा नव्हता. या सामन्यातून बोध घेत आमचा संघ पुढे जाणार आहे. होय, भारत अद्यापही विश्वचषक जिंकू शकतो, कारण एका पराभवाचा अर्थ स्पर्धेबाहेर होणे असा नव्हे! महान संघ जमीनदोस्त झाल्यानंतर पुन्हा सज्ज होतात. भारतीय संघ असे करण्यास सक्षम वाटतो. त्यामुळेच पाककडून पराभूत झाल्यानंतर अन्य खेळाडूंकडे अंगुलीनिर्देश करण्याऐवजी संघासोबत उभे राहणे महत्त्वपूर्ण आहे.
शाहीनशाह आफ्रिदीने सुरुवातीचा स्पेल धडाकेबाज टाकला. रोहित आणि राहुल हे सलामीवीर त्याच्या जाळ्यात अडकले तर सूर्यकुमार यादव खराब फटका मारण्याच्या नादात मोहम्मद रिझवानकडे झेल देत बाद झाला. रिझवाननेच नंतर कर्णधार बार आझमसोबत बहारदार फलंदाजी करीत बिनबाद विजय साकारला. हा विजय पाक संघाला विश्वास बहाल करणारा असून पाकिस्तान संघ बलाढ्य आहे, याची साक्ष पटविणारादेखील ठरला. पाकला आता न्यूझीलंडचा सामना करायचा आहे. प्रेक्षकांसाठी हा सामना मोठा नसेलही मात्र भारताविरुद्ध राखलेली जिद्द कायम ठेवूनच पाकला खेळावे लागेल. न्यूझीलंड संघ प्रतिस्पर्धी संघाला चकविण्यात तरबेज आहे.
दुसरा सामना द. आफ्रिका आणि विंडीज यांच्यात सेल. दोघांचे खाते रिकामे आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध लहान लक्ष्याचा बचाव करणाऱ्या द. आफ्रिकने अखेरच्या षटकापर्यंत रंगत आणली होती. दुसरीकडे विंडीजने इंग्लंडविरुद्ध कमकुवत कामगिरी केली होती. या प्रकारात दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेल्या विंडीजने पुनरागमनासाठी धडक प्रयत्न करायला हवा.
भारत- पाक लढत संपल्यानंतर आता विश्वचषक सामान्यपणे पुढे जाईल. चाहत्यांना भारतीय उपखंडाबाहेरच्या आणखी काही शानदार खेळाडूंची कामगिरी पाहता येईल. (टीसीएम)
Web Title: One defeat is not to get out of the competition, it is important to stand with the team instead of blaming the teammates!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.