गुवाहाटी : टी-२० विश्वचषकात रविवारी झालेल्या भारत-पाकिस्तानच्या (IND vs PAK) लढतीने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले होते. अशातच आसाममधील शिवसागर जिल्ह्यात भारत-पाकिस्तानचा सामना पाहत असताना हृदयविकाराच्या झटक्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. रविवारी संध्याकाळी ही घटना घडली असून ३४ वर्षीय बिटू गोगोई असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गोगोई त्यांच्या काही मित्रांसह रविवारी संध्याकाळी एका स्थानिक सिनेमा हॉलमध्ये गेले होते, जिथे सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जात होते. पण सामन्यादरम्यानच गोगोई अचानक बेशुद्ध पडले. त्यांच्या मित्रांनी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिकेट सामन्यादरम्यान चित्रपटगृहात जास्त प्रमाणात ध्वनिप्रदूषण झाल्यामुळे गोगोई यांना हृदयविकाराचा झटका आला. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. आता शिवसागर पोलिसांच्या पथकाने घटनेचा अधिक तपास सुरू केला आहे. खरं तर गोगाई यांना आरोग्याची कोणतीही समस्या नव्हती असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे.
भारताचा 'विराट' विजय
पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय गोलंदाजांनी आक्रमक मारा करून पाकिस्तानच्या सलामीवीरांना स्वस्तात माघारी पाठवले. भारतीय गोलंदाजांनी सांघिक खेळी करून प्रतिस्पर्धी संघावर दबाव कायम ठेवला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम डावाच्या दुसऱ्याच षटकांत बाद झाला. त्याला वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने बाहेरचा रस्ता दाखवला. अर्शदीप सिंगने पाकिस्तानच्या दोन्ही सलामीवीरांना स्वस्तात माघारी पाठवून भारताला चांगली सुरूवात करून दिली. अखेरच्या काही षटकांमध्ये पाकिस्तानने डाव सावरला आणि २० षटकांत ८ बाद १५९ धावा करून भारतासमोर विजयासाठी १६० धावांचे आव्हान ठेवले होते, ज्याचा पाठलाग करताना किंग कोहलीने ऐतिहासिक खेळी केली.
भारतीय गोलंदाजांची सांघिक खेळी
भारताकडून हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी ३-३ बळी घेतले. तर भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांना १-१ बळी घेण्यात यश आले. पाकिस्तानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरूवात अत्यंत निराशाजनक झाली होती. भारताचे दोन्ही सलामीवीर संघाच्या अवघ्या १० धावांवर माघारी परतले होते. मात्र विराट कोहलीने सावध खेळी करून डाव सावरला. सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेल हेही स्वस्तात परतले. संघाची धावसंख्या ३१ असताना ४ गडी बाद झाले होते. अशा स्थितीत किंग कोहलीने संघाचा डाव सावरला आणि अखेरच्या षटकापर्यंत नेला. विराट कोहलीने ५३ चेंडूत ८२ धावांची नाबाद खेळी करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
कोहलीची शानदार नाबाद खेळी
हॅरीस रौफच्या १९व्या षटकात विराटने दोन खणखणीत षटकार खेचून १५ धावा जोडल्या. भारताला आता६ चेंडूंत १६ धावा हव्या होत्या. मोहम्मद नवाजच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिकने उत्तुंग फटका मारला, परंतु बाबरने झेल टिपला. हार्दिक ३७ चेंडूंत ४० धावांवर बाद झाला. ३ चेंडूंत १३ धावा हव्या असताना विराटने खणखणीत षटकार खेचला अन् हाईटमुळे तो नो बॉल ठरवला गेला. आता ३ चेंडूंत ६ धावाच करायच्या होत्या. फ्री हिटचा चेंडू नवाजने वाईड टाकला. फ्री हिटवर चेंडू स्टम्पवर आदळून फाईन लेगला गेला, परंतु विराट व दिनेश कार्तिकने ३ धावा पळून काढल्या. पाकिस्तानचे खेळाडू प्रचंड नाराज दिसले. डेड बॉलची मागणी करू लागले. २ चेंडू २ धावा हव्या होत्या आणि कार्तिक स्ट्राईकवर होता. पण, कार्तिक स्टम्पिंग झाला. १ चेंडू २ धावा असे असताना अश्विन स्ट्राईकवर होता. नवाजने Wide टाकला अन् सामना बरोबरीत आला. अश्विनने विजयी चौकार मारला आणि भारताने ४ गडी राखून सामना जिंकला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: One dies of heart attack while watching India-Pakistan match in Guwahati, Assam
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.