T20 World Cup, Team India : भारतीय संघांची ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील कामगिरी ही खरंच चिंता व्यक्त करणारी आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय संघातील ड्रेसिंग रुमचं वातावरण बिघडलेल्या चर्चा रंगल्या होत्याच. त्याच पार्श्वभूमीवर विराट कोहलीनं ( Virat Kohli) वर्ल्ड कप स्पर्धेनंतर ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचे जाहीर केले. विराटच्या या निर्णयाचा भारतीय संघाच्या कामगिरीवरही परिणाम झालेला जाणवतोय. आता तर त्याचे वन डे संघाचे कर्णधारपद धोक्यात आले आहे. त्यात टीम इंडियात दोन गट पडल्याची शंका पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर ( Shoaib Akhtar) यानं व्यक्त केली आहे. टीम इंडियाच्या ड्रेसिंगरुममध्ये तणावाचं वातावरण आहे. भारतीय संघाची कामगिरी कशीही होत असली तरी विराट कोहली एक कर्णधार म्हणून त्याच्या परीनं सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. सहकाऱ्यांनी त्याचा सन्मान केला पाहिजे, असेही अख्तर म्हणाला.
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाला पहिल्या सामन्यात पाकिस्ताननं १० विकेट्स राखून, तर न्यूझीलंडनं ८ विकेट्स राखून पराभूत केलं आहे. आता उपांत्य फेरीच्या शर्यतीसाठी त्यांना अफगाणिस्तानच्या कामगिरीवर अवलंबून रहावं लागणार आहे. स्पोर्ट्सक्रीडा सोबत बोलताना अख्तर म्हणाला,''भारतीय संघात दोन गट पडल्याचे स्पष्ट दिसत आहे. एक गट कोहलीच्या बाजूनं आहे आणि दुसरा त्याच्या विरोधात. हे स्पष्ट दिसतेय... संघात फुट पडली आहे. असं का होतंय, हे मलाही कळत नाही. कदाचित कोहलीचं कर्णधार म्हणून ही अखेरची स्पर्धा असल्यानं असं होतंय. त्यानं कदाचित चुकीचा निर्णय घेतला असावा. पण, तो एक महान क्रिकेटपटू आहे आणि त्याचा आदर करायला हवा.''
न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली आणि अख्तरनं त्यावर प्रश्न उपस्थित केले. न्यूझीलंडच्या रणनितीचा सामना करण्यासाठी भारताकडे कोणताच गेम प्लान नव्हता, असा दावा अख्तरनं केला. ''टीका होणं गरजेचं आहे, कारण न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाची कामगिरी खरंच खराब झाली. नाणेफेक गमावल्यानंतर सर्वांचे तोंड पडली होती. काय करावं, हेच त्यांना कळत नव्हतं,''असेही तो म्हणाला.
टीम इंडियाचा पुढील सामना ३ नोव्हेंबरला अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. त्यानंतर ५ व ८ नोव्हेंबरला अनुक्रमे स्कॉटलंड व नामिबिया यांच्याशी टीम इंडिया भिडेल.