T20 WC 2023 । नवी दिल्ली : सध्या दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर महिला ट्वेंटी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. भारतीय संघाला सलामीच्या 2 सामन्यात विजय मिळवता आला मात्र इंग्लिश संघाने भारताला पराभूत करून टीम इंडियाचा विजयरथ रोखला. काल या स्पर्धेत भारतीय संघाने आयर्लंडचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आयर्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली. भारताने आयर्लंडसमोर 156 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, पावसाच्या व्यत्ययामुळे 8.2 षटकांत 2 बाद 54 धावाच करता आल्या. पाऊस थांबण्याची चिन्हे नसल्याने या सामन्यात भारतीय संघाने डकवर्थ लुईस नियमानुसार 5 धावांनी विजय मिळवला.
तत्पुर्वी, भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना चमकदार खेळी केली आणि 20 षटकांत 155 धावा करून आयर्लंडसमोर 156 धावांचे लक्ष्य ठेवले. मराठमोळ्या स्मृती मानधनाने शानदार खेळी करून आयर्लंडच्या गोलंदाजांना घाम फोडला. स्मृतीने 56 चेंडूत 87 धावांची खेळी केली, ज्यामध्ये 9 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश राहिला. स्मृतीला तिच्या शानदार खेळीमुळे सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. खरं तर स्टार फलंदाज स्मृती दुखापतीतून सावरत आहे. आता सध्या बोट ठीक असून मी आयर्लंडविरूद्धची खेळी सर्वात कठीण डावांपैकी एक खेळली असल्याचे स्मृतीने सामन्यानंतर सांगितले.
स्मृती मानधनाची यशस्वी खेळी "मी आणि सलामीवीर शेफाली वर्मा दोघींनी मिळून नियोजन केले आणि त्यानुसार डाव पुढे नेला. वारे खूप असल्यामुळे गोलंदाजांना अधिक मदत मिळत होती. पण त्याची आम्हाला सवय करून घेणे आवश्यक होते. उपांत्य फेरीत प्रवेश केल्याचा आनंद आहे. इंग्लंडविरूद्धचा सामना आम्हाला हवा तसा गेला नाही", असे स्मृती मानधनाने अधिक सांगितले.
हरमनप्रीत कौरसाठी ऐतिहासिक 'सामना' भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरसाठी आयर्लंडविरूद्धचा सामना ऐतिहासिक होता. कारण 150 ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी ती पहिली महिला क्रिकेटर ठरली आहे. तिच्या नेतृत्वात भारतीय संघाने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते. याशिवाय टीम इंडिया हरमनप्रीतच्याच नेतृत्वात सर्वाधिक ट्वेंटी-20 सामने जिंकली आहे. मात्र, आपल्या ऐतिहासिक सामन्यात कर्णधार हरमनप्रीतला काही खास कामगिरी करता आली नाही.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"