Join us  

पराभवासाठी एका खेळाडूला जबाबदार धरता येणार नाही; फलंदाजांचेही अपयश लक्षात घ्यावे

चौथ्या कसोटीत भारत जिंकून मालिकेत २-२ अशी बरोबरी साधेल, अशी आशा होती, पण या सामन्यात अखेर भारताचा पराभव झाला आणि इंग्लंडने ३-१ अशी विजयी आघाडी घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2018 2:23 AM

Open in App

- अयाझ मेमन(संपादकीय सल्लागार)चौथ्या कसोटीत भारत जिंकून मालिकेत २-२ अशी बरोबरी साधेल, अशी आशा होती, पण या सामन्यात अखेर भारताचा पराभव झाला आणि इंग्लंडने ३-१ अशी विजयी आघाडी घेतली. यामागे दोन मुख्य कारणे आहेत. एक म्हणजे रविचंद्रन अश्विनकडून खूप अपेक्षा होत्या. कारण ज्या खेळपट्टीवर फिरकीपटूंना खूप मदत मिळत होती, तिथे तो अपयशी ठरला. एकीकडे मोइन अलीने सामन्यात ९ बळी मिळविलेले असताना अश्विनने मात्र केवळ ३ बळी मिळविले. त्यामुळे हे एक मोठ अपयश ठरले, पण तरी माझ्यामते एका खेळाडूला जबाबदार ठरवता येणार नाही. फलंदाजांचेही अपयश लक्षात घ्यावे लागेल. दोन्ही डावांत एकदाही भारतीय फलंदाजांना तीनशेचा पल्ला पार करता आलेला नाही. पहिल्या डावात जेव्हा चेतेश्वर पुजारा-विराट कोहली खेळत होते, तेव्हा भारताची स्थिती २ बाद १३० धावा होती आणि त्यानंतर २७३ धावांवर बाद होणे अनपेक्षित होते.भारतासाठी सर्वात मोठी चिंतेची बाब राहिली ते सलामी जोडीचे अपयश. या मालिकेत कोहलीचा अपवाद वगळला, तर भारताचे इतर फलंदाज छाप पाडू शकले नाहीत. विशेष म्हणजे, दोन्ही संघांचे आघाडीचे फलंदाज फार काही करू शकले नाही, पण इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांनी चांगली खेळी केली आणि हाच फरक दोन संघांमध्ये राहिला. गोलंदाजीत अश्विनने चौथ्या कसोटीत नक्कीच निराश केले, पण वेगवान गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी हे सातत्याने २० बळी घेत आहेत. लॉडर््स सामन्याचा अपवाद वगळता, दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील तीन सामन्यांत ६० बळी आणि इंग्लंडविरुद्ध चारपैकी ३ सामन्यांत ६० बळी भारतीय वेगवान गोलंदाजांनी घेतले. पराभवास जबाबदार धरायचे असेल, तर ते फलंदाजांना धरावे लागेल. काहीही झाले, तरी भारतीय संघ कसोटीतील अव्वल संघ असल्याने त्यांच्याकडून विजयाची अपेक्षा होती.ओव्हल येथे होणारा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ त्वेषाने खेळतील. कोहलीनेही हा सामना जिंकण्यास पूर्ण प्रयत्न करू असे सांगितले. या सामन्यात भारतीय संघात काही बदलही होण्याची शक्यता आहे. सलामीवीर अपयशी ठरत असल्याने युवा पृथ्वी शॉला संधी मिळाली पाहिजे. शिवाय करुण नायर, हनुमा विहारी यांसारख्या नवोदित खेळाडूंनाही संधी मिळू शकते. गोलंदाजीत अश्विनच्या जागी रवींद्र जडेजाला संधी मिळू शकते.मानसिकरीत्याही सक्षम बनावे लागेल...ओव्हलची खेळपट्टी फिरकीपटूंना साथ देणारी मानली जाते, त्यामुळे कदाचित हार्दिक पांड्याऐवजी जडेजालाही संधी मिळू शकते, जेणेकरून दोन फिरकी गोलंदाज संघात राहतील, पण माझ्यामते आता संघाला केवळ विजयी कामगिरीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. कारण भारतीय संघाने जिंकत असलेले सामने गमावले आहेत. त्यामुळे संयमासोबतच मानसिकरीत्याही भारतीय संघाला अधिक सक्षम बनावे लागेल.

टॅग्स :क्रिकेटभारत विरुद्ध इंग्लंड